लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : चाेरट्यांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वडधामना येथील तकिया या वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम फाेडून त्यातील ३५ लाख ६४ हजार ९०० रुपये राेख काढून ती चाेरून नेली. चाेरट्यांनी ही मशीन कटरच्या मदतीने फाेडली असून, ही बाब कुणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून मशीन समाेरील पथदिवेही बंद केले हाेते. ही घटना रविवारी (दि. ४) मध्य रात्री घडली.
वडधामना येथील तकिया परिसर हा वर्दळीचा असून, या ठिकाणी एचडीएफसी बॅंकेचे एटीएम आहे. चाेरट्यांनी रविवारी मध्यरात्री या एटीएमला लक्ष्य केले. यासाठी त्यांनी मशीनसमाेर असलेले काही पथदिवे आधी बंद केले. त्यानंतर, खाेलीत प्रवेश करून मशीनच्या मागच्या भागाला असलेली वायरिंग ताेडली. पुढे त्यांनी मशीनचा मागचा भाग गॅस कटरने कापून रक्कम ठेवण्याचे ट्रे बाहेर काढून त्यातील रक्कम लंपास केली.
हा प्रकार रविवारी मध्यरात्रीपासून साेमवारी दुपारी १ वाजेपर्यंत कुणाच्याही लक्षात आला नाही, शिवाय बॅंकेची कंट्राेल रूम व एटीएमची सुरक्षा करणाऱ्यांनाही याबाबत माहिती नव्हती. सचिन चव्हाण यांना कुणीतरी दुपारी १ वाजताच्या सुमारास फाेनवरून हे एटीएम डाऊन असल्याची माहिती दिली आणि चाेरट्यांनी एटीएम फाेडून आतील रक्कम चाेरून नेल्याचा प्रकार पुढे आला. त्यामुळे या एटीएमच्या सेफ केअर कंपनीचे कंपनीचे सुपरवायझर सुशील रामराव सावरकर (३८, रा.लाकडी पूल, महाल, नागपूर) यांनी या मशीनची पाहणी करून पाेलिसात तक्रार दाखल केली.
चाेरट्यांनी या एटीएममधील ३५ लाख ६४ हजार ९०० रुपये राेख चाेरून नेल्याची माहितीही त्यांनी पाेलिसांना दिली. माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त नरूल हसन व ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी या मशीनची पाहणी केली. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
...
सुरक्षा वाऱ्यावर
या भागात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांची अनेक एटीएम आहेत. त्या एटीएममध्ये रकमेचा नियमित भरणा केला जाताे. मात्र, काेणत्याही एटीएमजवळ बॅंक अथवा त्यांच्या सुरक्षा एजन्सीने सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली नाही. याला वडधामना येथील एचडीएफसी बॅंकेचे एटीएमही अपवाद नाही. एटीएमच्या बाहेर व आत सुरक्षेच्या दृष्टीने केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, ते कॅमेरे सुरू आहेत की नाही, हे तपासण्याची तसदीही कुणी घेत नाही.