नागपूर : चार महिन्याच्या चिमुकल्यावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून मेंदूतून ट्युमर काढून त्याला जीवनदान देण्याची घटना नागपुरात घडली. विशेष म्हणजे, ‘एपेंडेमोमास’ नावाच्या या ट्युमरचे निदान वयाच्या साधारण ३० वर्षानंतर होते. परंतु डॉक्टरांनी आपला अनुभव व कौशल्याच्या बळावर वेळीच निदान करून शस्त्रक्रिया यशस्वी केली.
मध्य प्रदेश येथील उमरिया या छोट्याशा गावातील एक कुटुंब आपल्या चार महिन्याच्या मुलाला घेऊन नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आले. चिमुकल्याची प्रकृती गंभीर होती. हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणीनंतर हे प्रकरण न्यूरो सर्जन डॉ. अक्षय पाटील यांच्याकडे आले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, चिमुकल्याची लक्षणे पाहता ‘एमआरआय’ करण्याचा निर्णय घेतला. परंतु ‘एमआरआय’च्या वेळी बाळ सारखे हलत होते. यामुळे चारवेळा ‘एमआरआय’ काढावा लागला. यात बाळाच्या लहान मेंदूवर गाठ (ट्युमर) असल्याचे दिसून आले. ट्युमरमुळे मेंदूतील पाणी वाढले होते. यामुळे मेंदूचे पाणी पोटात टाकणे व गाठ काढणे अशी दुहेरी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा तासाच्या प्रयत्नानंतर या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. ३० डिसेंबर रोजी ही शस्त्रक्रिया केली. ७ जानेवारी रोजी चिमुकल्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या शस्त्रक्रियेत बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अवंतिका जयस्वाल व बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप यादव यांची मोलाची साथ मिळाल्याचेही डॉ. पाटील म्हणाले.
-कर्करोगाची गाठ
डॉ. पाटील म्हणाले, ‘एपेंडेमोमास’ ही कर्करोगाची गाठ आहे. वयाच्या ३० वर्षानंतरच या गाठीचे निदान होते. परंतु लक्षणे पाहत तातडीने चाचण्या केल्याने त्याचे निदान झाले. ही गाठ मेंदूला चिकटून होती. यामुळे ती काढणे अत्यंत कठीण होते. सध्या बाळाची प्रकृती सुधारत आहे.