नागपूर : पूर्व नागपुरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाची मंजुरी मिळून दोन वर्षे झालीत. मात्र या कार्यालयाला पूर्व नागपुरात जागा मिळत नव्हती. बऱ्याच प्रयत्नानंतर या कार्यालयाला डिप्टी सिग्नल चिखली देवस्थान येथील नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) सभागृहाची जागा भाडे तत्त्वावर मिळाली. उद्या शनिवारपासून या नव्या जागेवरून पूर्व आरटीओचा कारभार चालणार आहे. परंतु निधी न मिळाल्याने सध्या फक्त परिवहन संवर्गातील वाहनांचे कामकाज चालणार आहे.वाढते शहर, वाढती वाहने व वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्व नागपूरसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याला २४ आॅगस्ट २०११ ला मंजुरी मिळाली. पूर्व नागपूरकरांची ‘एम. एच. ४९’ अशी नवी ओळख निर्माण झाली. त्यावेळचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग यांच्याकडे या कार्यालयाची जबाबदारी येताच त्यांनी स्वतंत्र कार्यालयाच्या जागेसाठी प्रयत्न चालविले. परंतु जागेची समस्या मार्गी लागली नाही. परिणामी, शासनाच्या आदेशानुसार नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या तळमाळ्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले. यामुळे या कार्यालयाचा मुख्य हेतू मागे पडला होता. गडसिंग यांची बदली होऊन या जागेवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार यांची नियुक्ती होताच त्यांनी आपल्यापरीने स्वतंत्र जागा मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले. प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात चिखली देवस्थान, डीप्टी सिग्नल येथील पाण्याच्या टाकीजवळील नासुप्रचे सभागृह भाडे तत्त्वावर मिळण्यास त्यांना यश मिळाले. शनिवारपासून या नव्या जागेतून कामकाज सुरू होणार आहे. परंतु कोट्यावधीचा महसूल गोळा करणाऱ्या परिवहन विभागाने निधी उपलब्ध करून न दिल्याने सध्या परिवहन संवर्गातील वाहनांचे कार्य या नव्या जागेतून चालणार आहे. (प्रतिनिधी)
पूर्व आरटीओ कार्यालय गेले डीप्टी सिग्नलला
By admin | Updated: October 18, 2014 03:01 IST