- विदर्भ ऑटोरिक्षा चालक महासंघाची मागणी : कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ हवी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने ऑटोरिक्षा चालकांची चांगलीच फजिती झाली आहे. त्यामुळे, मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ या काळात ऑटोरिक्षा चालकांनी ऑटो खरेदीसाठी काढलेल्या कर्जावरील व्याज सरसकट माफ करण्याची मागणी विदर्भ ऑटोरिक्षा चालक महासंघाने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत राज्य सरकारला देण्यात आले.
लॉकडाऊनमुळे ऑटाेरिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प होता. चालकांनी ऑटोरिक्षा खरेदी करण्याकरिता सरकारी बँक, पतसंस्था, सहकारी बँक, खासगी फायनान्स, आदींकडून कर्ज घेतले आहे. याबाबतची नोंद आरटीओ कार्यालयाच्या अभिलेखावर वाहनांच्या नोंदणी पुस्तकात आहेत. दीर्घकाळातील लॉकडाऊनमुळे ऑटो चालक घरीच होते. मात्र, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी बँका व वित्त संस्थांकडून सातत्याने तगादा लावला जात आहे. कर्ज फेडण्यासाठी धमक्याही दिल्या जात आहेत. मात्र, कमाईच नाही तर हप्ते फेडायचे कसे, हा प्रश्न आहे. त्यामुळे, शासनाने मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत कर्जावरील व्याज सरसकट माफ करावे आणि हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास संवैधानिक पद्धतीने राज्यभरात आरटीओ कार्यालयापुढे निदर्शने करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी विदर्भ ऑटोरिक्षा चालक महासंघाचे अध्यक्ष चरणदास वानखेडे, महासचिव भरत लांडगे, गणेश मेश्राम, मेहबुब अहमद, किशोर बांबोले, नियाज अली, रामराव वाकडे, मनोहर गजभिये, मिलिंद गजभिये, दासबोध आनंदम, राजेश रंगारी, धर्मपाल लामसोंगे, शाहीन, रमेश कांबळे उपस्थित होते.
.................