शोधमोहिम थंडावली : संशयित आरोपींची जामिनावर सुटका नागपूर : मागील चार महिन्यांपूर्वी अचानक गायब झालेल्या उमरेड-कऱ्हांडला येथील ‘जय’ चा वन विभागाला अजूनपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. यामुळे वन विभाग चांगलाच अस्वस्थ झाला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी भंडारा व नागपुरातील वन विभागाच्या पथकाने पवनीशेजारच्या कोदुली येथील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अनावश्यक गुन्हे दाखल केल्याची घटना पुढे आली आहे. किसन इस्तारी समर्थ व मधुकर मुरलीधर हटवार अशी त्या व्यक्तींची नावे आहेत. माहिती सूत्रानुसार वन विभागाला १८ एप्रिल २०१६ रोजी ‘जय’ चे शेवटचे लोकेशन किसन समर्थ यांच्या शेतात सापडले आहे. शिवाय हटवार यांनी कधीकाळी जंगली सशाची शिकार केली होती. केवळ या दोन गोष्टीच्या आधारे वन विभागाने मंगळवारी एखाद्या सराईत शिकाऱ्याप्रमाणे या दोन्ही लोकांच्या घरावर धाडी घालून त्यांना ताब्यात घेतले. एवढेच नव्हे तर त्यांची रात्रभर कसून चौकशीही केली. मात्र शेवटी त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही आणि न्यायालयाने बुधवारी दोघांचीही जामिनावर सुटका केली. मात्र त्याचवेळी या घटनेने वन विभागाचा फोलपणा चव्हाट्यावर आला आहे. वन विभागाकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना या लोकांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईबद्दल स्थानिक गावकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहे. शिवाय वन विभाग ‘जय’ च्या शोधमोहिमेतील अपयश लपविण्यासाठी अशा खोट्या कारवाई करीत असल्याचाही आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, ‘जय’ हा वन विभागाच्या चांगल्याच मानगुटीवर बसला आहे. त्यामुळे ‘जय’ चा शोध घेणे वन विभागापुढे एक आव्हान ठरले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात ‘जय’ हा सुरक्षित असून तो परत येणारच! असे जाहीर केल्याने वन विभागावर अधिकच दडपण वाढले आहे. जाणकारांच्या मते, वन विभागाच्या अशा कारवायांमुळे ‘जय’ ची शोधमोहिम भरकटली जात आहे. माहिती सूत्रानुसार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांच्या निर्देशानुसार मागील महिनाभरापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील विभागीय वन अधिकारी एस. बी. भलावी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेली शोधमोहिम थंडावली आहे. (प्रतिनिधी)
वन विभाग ‘जय’साठी अस्वस्थ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 02:38 IST