सुमित्रा महाजन यांचा सल्ला : देवी अहल्या मंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटननागपूर : पुण्यश्लोक देवी अहल्याबाई होळकर यांचे कर्तृत्व, व्यवस्थापन आणि संस्कृतीचे ज्ञान अलौकिक व अप्रतिम होते. त्यांच्या गुणांचे शत्रू राष्ट्रदेखील सन्मान करायचे. देशाचे विदेश मंत्री तसेच संस्कृती मंत्र्यांनीदेखील अहल्याबाईंच्या आदर्शांपासून शिकवण घेतली पाहिजे, असे मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. देवी अहल्या मंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, देवी अहल्याबाई स्मारक समितीच्या उपाध्यक्ष जयश्री खांडेकर, चित्रा जोशी या प्रामुख्याने उपस्थित होत्या. देवी अहल्याबाईचे कर्तृत्व, राणी झाशीबाईचे नेतृत्व व राजमाता जिजाबाईचे मातृत्व हे प्रत्येक महिलेसाठी आदर्श आहेत. मातृभावाने प्रेरित झालेल्या व्यक्तींच्या संकल्पनेतून साकारलेले देवी अहल्या मंदिर म्हणजे अक्षय ऊर्जेचे स्थान आहे. देवी अहल्या मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी वसतिगृहच चालविण्यात येत नाही, तर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडविण्यात येते. येथे विद्यार्थिनींना दिली जाणारी शिक्षा व दीक्षा हे कार्य ५० वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. अहल्याबाईंचा आदर्श समोर ठेवून येथील सेविका सेवाभावाने कार्य करतात, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या. आजकाल मुले ही गुण कमावण्याची मशीन बनत चाललीत. पालकदेखील त्यांचे मार्क्स, निकाल यात गुरफटले आहेत. हल्ली कंपनीच्या पॅकेजची चर्चा होते. पण व्यक्तित्वाचे ‘पॅकेज’ घडविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनदेखील सुमित्रा महाजन यांनी केले. देवी अहल्या मंदिरातून मिळणाऱ्या संस्कारांमधून अनेक घरांमध्ये शक्तीपीठ स्थापन झाले आहे. येथून सेवाकार्याची प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार शांताक्का यांनी काढले. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांच्या यशकथांचा समावेश असणाऱ्या ‘कर्तृत्व, नेतृत्व , मातृत्व’या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. चित्रा जोशी यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
विदेश मंत्र्यांनी अहल्याबाईंचा आदर्श घ्यावा
By admin | Updated: October 26, 2015 02:51 IST