नागपूर : वन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तिढा अद्याप सुटलेला नसून, गुरुवारी संपाच्या चौथ्या दिवशीही शेकडो वन कार्यालयासमोर जोरदार नारे-निदर्शने केली. गत २५ आॅगस्टपासून पुकारण्यात आलेल्या या बेमुदत संपात वन विभागातील स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) च्या जवानांनी उडी घेतली आहे. एसटीपीएफ जवानांच्या या सहभागामुळे वन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे. मात्र त्याचवेळी वन विभागासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, मानसिंगदेव, उमरेड-कऱ्हांडला, नवेगाव व नागझिरा अभयारण्यातील वाघांच्या संरक्षणासाठी एसटीपीएफची फौज तैनात करण्यात आली आहे. जंगलातील सर्व वनमजूर, वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना, आजपर्यंत याच जवानांनी जंगलाच्या सुरक्षेची धुरा सांभाळली आहे. परंतु सुरुवातीला आंदोलनापासून अलिप्त राहिलेल्या या जवानांनी बुधवारपासून अचानक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या नेतृत्वात शेकडो वन कर्मचाऱ्यांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील नागपूर वनवृत्त कार्यालयासमोर गुरुवारी दिवसभर घोषणाबाजी केली. त्याचवेळी वन विभागाने वन कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे लक्षात घेऊन, गुरुवारी दुपारी वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. एन. मुंडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसेच त्यांनी वन कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली. परंतु वन कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे मुंडे यांना निराश होऊन, परतावे लागले. आंदोलनात सेमिनरी हिल्ससह कळमेश्वर, काटोल, कोंढाळी, उमरेड, भिवापूर, रामटेक, खापा, पारशिवनी, पवनी, देवलापार, बुटीबोरी, नरखेड, कुही व पेंच येथील हजारो वनमजूर, वनरक्षक व वनपाल कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनात आर. बी. धोटे, के. जे. बन्सोड, एस. एस. सरकार, पी. पी. कोरे, एम. एस. मोघे, डी. जी. कुशवाह, रमेश गिरी, एकनाथ भोयर, पी. डी. बैस, अनिल खडोतकर, एम. आर. फुकट, आय. ए. जळीत, केशव अहिरकर, नरेंद्र पुरी, यू. पी. बावणे, डी. बी. खंडार, पी. डी. वाघमारे, सतीश जांभुळकर व सुनील फुलझेले आदींनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)
वन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बळ !
By admin | Published: August 29, 2014 12:57 AM