विठुरायाला साकडे : बा विठ्ठला! पावसाने शेतजमीन भिजवविजय नागपुरे । लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : आषाढी पौर्णिमेच्या द्वादशीनिमित्त ‘विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र धापेवाडा नगरी’ सोमवारी विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमली. लाखो भाविकांनी येथे हजेरी लावत ‘बा विठ्ठला! पावसाने शेतजमीन भिजव’ असे विठ्ठल चरणी साकडे घातले.पहाटे ५ वाजता विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या हस्ते पार पडली. याप्रसंगी खा. कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिल्हा परिषद सदस्य अरुणा मानकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, माजी जि. प. सदस्य राजेश जिवतोडे, अॅड. प्रकाश टेकाडे, सरपंच डॉ. मनोहर काळे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार, शंकर ठाकरे, बाबा कोढे, इमेश्वर यावलकर आदी उपस्थित होते. भाविकांना आरोग्यविषयक अडचणी जाणवल्यास त्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र धापेवाडाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून होते. पोलीस स्टेशन सावनेर, कळमेश्वर, केळवदच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. तसेच ग्रामपंचायत धापेवाडा, रुहानी सेवा केंद्र कळमेश्वर, कोलबास्वामी विद्यालय, नगर परिषद कळमेश्वर, मोहपा, सावनेर, एसटी महामंडळ, वीज वितरण कंपनी यांनी विशेष सहकार्य दिले. यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पडावा, यासाठी विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, सहसचिव विलास वैद्य, कोषाध्यक्ष रामदास पांडे, विश्वस्त भानुप्रतापसिंह पवार, अरुण चिखले, प्रभाकर रानडे, विलास ठाकरे यांनी सहकार्य केले.३०० दिंडी पालखींचा सहभागमंदिर परिसरात जवळपास ३०० च्या वर भजन मंडळे व दिंड्या पालखी बाहेरगावाहून आल्या होत्या. ‘पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी’च्या जयघोषात टाळ मृदंगाच्या साथीने भजन, कीर्तन, प्रवचन म्हणत लाखो भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर कमिटीतर्फे करण्यात आली होती. तर येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद आणि अल्पोपहाराची व्यवस्था करून देण्यात आली होती. भाविकांनी दर्शनानंतर दिंड्यासह चंद्रभागेच्या वाळवंटात ठाण मांडल्याने चंद्रभागेला भक्तीचा महापूर आल्याचे दिसत होते.
विदर्भाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी
By admin | Updated: July 11, 2017 01:41 IST