आॅनलाईन अर्ज : १० मिनिटांत सर्व जागा ‘फुल्ल’कोराडी : महानिर्मितीच्या कोराडी प्रशिक्षण केंद्रातर्फे चार आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले. यानुसार एकूण ३५० जागांसाठी आॅनलाईन लिंक सुरू होताच अवघ्या १० मिनिटात सर्व जागा ‘फुल्ल’ झाल्या. याव्यतिरिक्त १०० विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आले आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत तसेच हिवाळ्यात महानिर्मितीच्या कोराडी प्रशिक्षण केंद्रातर्फे चार आठवड्याचे औद्योगिक प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इंडस्ट्रियल पॉवर प्रॉडक्शनमधील पदवीच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसलेले किंवा अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पदविका द्वितीय वर्षाच्या परीक्षेला बसलेले, चौथ्या सत्राच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी - विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र ठरतात. या चार आठवड्यात प्रशिक्षणार्थ्यांना सीडीमध्ये अभ्यास साहित्य, वीजनिर्मिती क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन, वीज केंद्रातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट, प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. यानुसार ३५० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. २४ एप्रिलपासून या प्रशिक्षणासाठी अर्ज करावयाचे होते. यात पहिल्याच दिवशी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ वाजता लिंक सुरू होताच अवघ्या १० मिनिटांतच ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. याशिवाय १०० विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये स्थान मिळाले. अर्जामधील प्रथम ३५० पैकी जे विद्यार्थी नियोजित कालावधीत रुजू होणार नाहीत, त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे, यासाठी ९ मे रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कोराडी प्रशिक्षण केंद्राचे मुख्य अभियंता मधुकर कुंडलवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महानिर्मितीच्या प्रशिक्षणासाठी झुंबड
By admin | Updated: April 28, 2016 03:00 IST