नागपूर : मोबाईल व्यापारी भरत खटवानी यांच्या हत्याकांडातील पाच आरोपींना तब्बल पाच दिवसानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सर्व आरोपी सीताबर्डी, गुजरवाडी व गणेशपेठ येथील आहे. या आरोपींपैकी तीन जणांना मध्यप्रदेशच्या बैतुल येथे तर दोघांना नागपुरातच अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या व्यापाऱ्याचा खंडणीसाठी सुपारी देऊन खून करण्यात आल्याचा कयास आहे. तरीही पोलीस हत्येमागील नेमके कारण काय याबाबत तपास करीत आहे. सौरभ ऊर्फ अंबा विलास आंबटकर, रा. शनिवारी वस्ती गणेशपेठ, शुभम देवराव रामटेके (२०) रा. गुजरवाडी, जितेश दिनेश जाधव (२०) रा. गुजरवाडी, शेख शरीप शेख सलीम (३२) रा. तेलीपुरा, आकाश ऊर्फ काल्या चंद्रसेन सरोद (२१) रा. तेलीपुरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट येथील हॅलो वर्ल्ड मोबाईल शॉपीचे मालक भरत खटवानी यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान हल्ल्यातील गंभीर जखमी खटवानी यांचा शुअरटेक इस्पितळात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हल्ल्याच्या या घटनेने आजही व्यापारी संतप्त आहेत. घटनेच्या दिवशीपासून आजपर्यंत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट बंद ठेवले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही, मार्केट बंद राहील असा इशारा त्यांनी दिला होता. प्राप्त माहितीनुसार खटवानी यांच्यावर दोन वर्षीपूर्वी असाच प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावरून हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी या पाच अटक अरोपींपैकी शेख शरीफ याचे नाव पुढे आले होते. त्यावेळच्या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यावरून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश मांडे यांच्यावरही सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी व्यापाऱ्यांनीच समझोत्याची भूमिका घेतल्याने शरीफचे कृत्य दडपले गेले होते. हा समझोता खटवानी यांचा जीव घेणारा ठरला. त्यावेळी शरीफवर कठोर कारवाई झाली असती तर नुकताच झालेला हल्ला टळला असता, असे बोलले जाते. कोणतीही कारवाई न झाल्याने शरीफ निर्ढावला आणि पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. (प्रतिनिधी)खुन्यांना दिले केवळ पाच हजारखुनाचा सूत्रधार शेख शरीफ याने खटवानी यांच्या खुनाचा कट रचला होता. त्याने प्रत्यक्ष खून करणाऱ्यांना केवळ ५ हजार रुपये दिले होते. आणि काम झाल्यानंतर २ ते ३ लाख रुपये देऊ केले होते, अशी खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. सुपारी दिल्यानंतर शेख शरीफ हा धार्मिक यात्रेसाठी निघून गेला होता. त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क बंद केला होता. टी-शर्टवरून गवसले मारेकरीहत्याकांडातील मारेकऱ्यांपैकी सौरभ आंबटकर हा इलेक्ट्रॉन्किस मार्केटमध्ये एका दुकानात काम करीत होता. दुकान मालकाने सर्व नोकरांना एकसारखे टी-शर्ट दिले होते. सौरभने हल्ल्याच्या दिवशी हाच टी-शर्ट घातला होता. हल्ल्यानंतर फरार होतांना काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. या टी-शर्टचे वर्णनही त्यांनी पोलिसांना सांगितले होते. नेमक्या याच टी-शर्टवरून सौरभसह अन्य आरोपींचा सुगावा लागला.
मोबाईल व्यापाऱ्याच्या खुनात पाच जणांना अटक
By admin | Updated: March 12, 2015 02:39 IST