लोखंडी सळीने केले वार : सेंट्रल एव्हेन्यूवर थरार नागपूर : व्यापाऱ्याच्या नोकरांना मारहाण करून ५ लाखांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ ते ३.१५ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवर घडली. दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेत अनेक संशयास्पद दुवे आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. छापरूनगर, लकडगंज भागात राहणाऱ्या नरेश रजई नामक व्यापाऱ्याचे इतवारीत सराफा दुकान आहे. तेथे यशवंत खानोरकर आणि अभिमन्यू भारद्वाज काम करतात. मालकाने सांगितल्याप्रमाणे दुकानातील ५ लाखांची रोकड अॅक्टीव्हाच्या (एमएच ३१/ ५६८९) डिक्कीत घालून हे दोघे रजईच्या घराकडे जात होते. दुपारी ३.१५ च्या सुमारास ते सेंट्रल एव्हेन्यूवरील चंद्रहास बार समोर येताच दोन आरोपींनी अॅक्टीव्हावरील यशवंत आणि अभिमन्यूवर लोखंडी सळाखीने वार केला. त्यामुळे हे दोघे खाली पडले आणि आरोपींनी त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला. यशवंतने लगेच आपल्या मालकाला फोनवरून या लुटमारीची माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षात १०० क्रमांकावर फोन केला. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने या भागातील गस्तीवरील पोलीस पथकांना लुटमारीची माहिती देऊन तातडीने घटनास्थळावर पाठविले. त्यानुसार, तहसील तसेच लकडगंज पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी आले. लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने आपल्या ताफ्यासह पोहचले. त्यांनी यशवंत आणि अभिमन्यूकडून आरोपींबाबत माहिती घेतल्यानंतर शहर पोलिसांना अॅक्टीव्हाच्या क्रमांकासह आरोपीचे वर्णन कळवून त्यांना पकडण्याच्या सूचना केल्या. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने संबंधितांमध्ये खळबळ उडाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, गुन्हेशाखेचे रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अभिनाशकुमार यांनीही घटनास्थळ तसेच लकडगंज ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. (प्रतिनिधी)काय आहे वास्तव ? या घटनेचे वास्तव, वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नाही. मात्र, या संबंधाने संबंधीत वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ही घटना घडली की घडवून आणण्यात आली, त्याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहे. पोलीस त्याचीही शहानिशा करीत आहेत. एका जणाच्या घरी लग्न असल्यामुळे त्याला देण्यासाठी आपण ही रक्कम यशवंत आणि अभिमन्यूच्या हाताने दुकानातून बोलवून घेतली होती, असे नरेश रजाईने पोलिसांना सांगितले. मात्र, ही रक्कम पाच लाख होती की ३५ लाख त्याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. हवालाशीही हे प्रकरण जुळल्याची चर्चा आहे. दरम्यान, लकडगंज ठाण्यात रात्री ३९४ कलमानुसार लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच लाखांसह दुचाकी पळविली
By admin | Updated: April 8, 2016 02:35 IST