परवान्यासाठी अर्ज : सर्वांनीच केली तयारीनरेश डोंगरे नागपूरसर्वोच्च न्यायालयाने डान्सबार बाबतच्या परवान्याबाबत राज्य सरकारला दिलेल्या निर्देशामुळे राज्यभरातील डान्स बार मालक आणि आंबटशौकिनांना धुमारे फुटले आहेत. उपराजधानीतही पाच बारमालकांनी ‘डान्स’चा परवाना मिळावा म्हणून पोलीस आयुक्तालयात परवानगी मागितली आहे. या पाचही जणांनी ‘डान्स बार‘ची जोरदार तयारीही करून ठेवली आहे.२००५ पूर्वी उपराजधानीत एक कॅब्रे अन् सहा डान्सबार असे एकूण सात डान्सबार होते. त्यातील सर्वात चर्चित होता धरमपेठेतील लाहोरी! लाहोरी बारच्या संचालकाजवळ कॅब्रेचे परफॉर्मन्स लायसेन्स होते. एमआयडीसीतील ग्रेट मराठा, सीताबर्डीत शेरे पंजाब, गोल्डन स्पून, धंतोलीतील निडोज, सोनेगावमध्ये पार्क इन आणि सेंट्रल एव्हेन्यूवर सोना बार संचालकांकडे डान्स बारचा परवाना होता. राज्य सरकारने २००५ मध्ये डान्स बारवर बंदी घातली. त्यानंतर सीताबर्डीतील शेरे पंजाब आणि सेंट्रल एव्हेन्यूवरील सोना डान्स बारच्या मालकांनी बार बंद करून ती जागाही विकून टाकली. वर्धा मार्गावरील पार्क इन डान्स बारची जागा मिहानमध्ये गेली. उर्वरित चारपैकी एमआयडीसीतील ग्रेट मराठा (एक्झिक्युटीव्ह) दोन वर्षांपूर्वी दुसऱ्या एका हॉटेल मालकाने विकत घेतले. सारी नाईट बेशर्मी की हाईटडान्स बारमध्ये बसलेल्या आंबटशौकिनांकडून प्रचंड पैसा उधळला जातो. बारमध्ये बसून दारू पिणाऱ्यांच्या तुलनेत डान्स बारमध्ये बसलेल्यांना दारूच्या पेल्याची दुप्पट तिप्पट किंमत चुकवावी लागते. नोटांचाही पाऊस पडतो. त्यामुळे बंदी असूनही नागपूर शहर आणि जिल्ह्यात एक डझनपेक्षा जास्त ठिकाणी चोरी-छुप्या मार्गाने डान्स बार चालविले जातात. मुंबई, पुणे, चेन्नई, बंगरुळू, हैदराबाद, पटियाला, कोलकाता, लुधियाना, दिल्ली, रायपूर, इंदोर, लखनौ आणि अशाच काही महानगरातील बहुचर्चित ‘बार डान्सर्स‘ना बोलवून ‘सारी नाईट बेशर्मी की हाईट‘चा प्रकार चालतो. चार-साडेचार तासांच्या अवधीत नोटांचा अक्षरश: पाऊस पडतो. त्यामुळे छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू असतात. ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असताना सेंट्रल एव्हेन्यूवरील एका हॉटेलमध्ये ‘डान्स बार’ सुरू झाला होता. तत्पूर्वी नंदनवन आणि सोनेगाव तसेच ग्रामीण भागातील एका ‘डान्स बार’वर पोलिसांनी छापा घातला होता. महिला संचालिकेचीही मागणीआर्थिक गणित लक्षात घेत शहरातील जुन्या डान्स बारपैकी लाहोरी, गोल्डन स्पून आणि निडोज बारसह वाडीतील शिकारा बार आणि कळमन्यातील सर्जा बारच्या संचालकानेही डान्स बारची परवानगी मिळावी म्हणून पोलिसांच्या परवाना शाखेकडे अर्ज केला आहे. सरकार आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पूर्णत: पालन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. विशेष म्हणजे, गोल्डन स्पून बारचा परवाना एका महिलेच्या नावावर आहे. पोलीस आयुक्तालयातून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
उपराजधानीत पाच डान्सबार?
By admin | Updated: March 18, 2016 03:06 IST