लोकसभा निवडणुकांत जिल्हाधिकारी कार्यालयाचा खर्च : १८ कोटींचा निधी वापरलानागपूर : लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांचा खर्च मर्यादेतच असावा असा नियम आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवडणुकींच्या निमित्ताने चक्क १८ कोटीहून अधिक रुपयांचा निधी खर्च केला. मंडपासाठी साडेतीन कोटी तर पेट्रोलसाठी १४ लाख रुपये वापरण्यात आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी लोकसभा निवडणुकांत जिल्हाधिकारी कार्यालयाने कुठल्या बाबींवर किती व कसा खर्च केला याबाबत माहिती मागवली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ कोटी २० लाख रुपयांचा निधी दिला होता. यातील जवळपास सर्व निधी विविध बाबींवर खर्च करण्यात आला व केवळ ३२५ रुपये शासनाला परत करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे झालेल्या एकूण खर्चापैकी ३ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च हा निविदा न काढताच करण्यात आला. यात राजपत्रित अधिकारी, वाहनचालक, कर्मचाऱ्यांचे भत्ते व मानधन यांचादेखील समावेश आहे. एकूण खर्चाचा ताळमेळ योग्य असल्याचा निर्वाळादेखील विभागीय आयुक्तांनी तपासणीनंतर दिला होता.(प्रतिनिधी)
पाच कोटींचे मंडप अन् १४ लाखांचे पेट्रोल
By admin | Updated: September 10, 2015 03:31 IST