लाेकमत न्यूज नेटवर्क
हिवराबाजार/देवलापार : माेगरकसा (ता.रामटेक) या संरक्षित जंगलातून सागवान झाडांची अवैध ताेड करून लाकडे चाेरून नेल्याप्रकरणी वनविभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून ट्रॅक्टर व माेटारसायकल जप्त केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भाेंगाडे यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये चिंतामनहरी मेहेर, पंकज बबन साेनवाने, सुधाकर मसराम, सुधाकर काेेकाेडे व अविनाश मरकाम यांचा समावेश आहे. माेगरकसा संरक्षित जंगलातील सागवान झाडांची अवैध ताेड करण्याचे लक्षात येताच, वनविभागाने पंचनामा करून प्रकरणाची चाैकशी करायला सुरुवात केली. सागवानाची काही लाकडे रामचंद्र शिंगाडे यांच्या सालई शिवारातील शेताजवळच्या झुडपांमध्ये आढळून आल्याने, तसेच शिंगाडे यांचे शेत चिंतामन मेहेर याने ठेक्याने केल्याने त्याच्यावर संशय हाेता. त्यातच सालई येथील काहींनी सागवान झाडे ताेडल्याची माहितीही वन कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली हाेती. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी (दि. २३) अविनाश मरकामला चाैकशीसाठी ताब्यात घेतले.
चाैकशीदरम्यान त्याने इतरांची नावे सांगितल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही झाडे आपण चिंतामन मेहेर याच्या सांगण्यावरून ताेडल्याचे, तसेच या कामासाठी प्रत्येकी २०० रुपये घेतल्याने इतरांनी सांगितल्याने पुढे चिंतामनलाही ताब्यात घेण्यात आले. या सर्वांनी गुन्ह्याची कबुुली देत, ही झाडे आपण सागवान लाकडे विकण्यासाठी ताेडल्याचे सांगितले. त्यामुळे या सर्वांना भारतीय वन अधिनियम १९७२ व महाराष्ट्र वन नियमावली नियमान्वये गुन्हा नाेंदवून अटक केली. या आराेपींना न्यायालयाने वन काेठडी सुनावली असून, त्यांच्याकडून त्यांनी लाकडांच्या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रॅक्टर व माेटारसायकल जप्त केल्याचेही वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भाेंगाडे यांनी सांगितले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भाेंगाडे, क्षेत्र सहायक बाबीनवाले, हटवार, वनरक्षक इटवले, गंधारे, साेडगीर, मस्के, पिल्लेवान, माटे, विनाेद टेकाम यांच्या पथकाने केली.
अवैध वृक्षताेड
....
१,१२,२८६ रुपये किमतीचे सागवान
या आराेपींनी सागवानाची एकूण २७ झाडे ताेडली असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. त्यांच्याकडून एकूण ३८ लाकडे व १५ नग फाटे जप्त करण्यात आले. त्या सर्व सागवान लाकडांची किंमत १ लाख १२ हजार २८६ रुपये असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भाेंगाडे यांनी दिली. ही सर्व इमारती लाकडे आहेत. रामचंद्र शिंगाडे यांच्या सालई शिवारातील शेतालगतच्या झुडपांमधून ४५ हजार ७८९ रुपये किमतीचे १३ नग सागवान लाकडे जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.