लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक डास माणसाची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव मागील सात वर्षांपासून नागपूरकर अनुभवत आहेत. परंतु, पहिल्यांदाच यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामागे मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने मार्च महिन्यापासून केलेल्या उपाययोजना व कोरोनामुळे अनेकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे २०१९मध्ये सर्वाधिक ६२७ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती तर २०२०मध्ये सर्वात कमी १०७ रुग्ण आढळून आले.
नागपुरात पहिल्यांदाच २०१४मध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली. ६०१ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली होती. कमी मनुष्यबळ, अद्ययावत यंत्रसामुग्रीचा अभाव यामुळे डेंग्यू नियंत्रणात येत नव्हता. त्यातच डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्वांची असताना नागरिकांचा सहभाग अल्प होता. परिणामी, २०१५मध्ये २३० रुग्ण, २०१६मध्ये १९५ रुग्ण व एक मृत्यू, २०१७मध्ये १९९ रुग्ण, २०१८मध्ये ५६५ रुग्ण, २०१९मध्ये ६२७ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. परंतु, २०२०मध्ये मार्च महिन्यापासूनच घराघरांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. डेंग्यूच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्यात आल्या. दूषित घरांना नोटीस बजावण्यात आली. सोबतच साचलेल्या पाण्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. परिणामी, डेंग्यूचा विळखा सैल होऊन रुग्णांची संख्या कमी झाली.
- कोरोना दहशतीचाही झाला फायदा
कोरोनाचा काळात डेंग्यूला दूर ठेवण्यासाठी अनेक नागरिकांनी आवश्यक उपाययोजना केल्या. शिवाय, रहदारीचे प्रमाण कमी असल्याने डेंग्यूचे रुग्ण एकाच ठिकाणी होते. सोबतच डेंग्यू डासांचा प्रवासही कमी झाल्याने त्याचा फायदा झाला, अशी माहिती मनपा हिवताप व हत्तीरोग विभाग अधिकारी दीपाली नासरे यांनी दिली.
-आशीनगर झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण
यावर्षी डेंग्यूचे रुग्ण कमी दिसून आले असले तरी महानगरपालिकेच्या १० झोनपैकी सर्वाधिक रुग्ण आसीनगर झोन अंतर्गत वसाहतींमध्ये आढळून आले. २०१९मध्ये मनपाच्या गांधीबाग झोनमधील वसाहतींमध्ये डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.
-आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा
डेंग्यूला कारणीभूत असलेले एडिस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे यातले पाणी दर आठवडयाला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा, तरच चिकटलेली अंडी निघतात. डेंग्यूवर उपचार नाही, दिसून आलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. यामुळे या डासाची उत्पत्तीच होणार नाही, यासाठी प्रत्येक नागरिकाने याला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
- दीपाली नासरे
हिवताप व हत्तीरोग विभाग, मनपा
वर्षेरुग्णमृत्यू
२०१६ १९५ ०१
२०१७ १९९ ००
२०१८ ५६५ ००
२०१९ ६२७ ०१
२०२० १०७ ०१
:: डेंग्यूची लक्षणे
-एकदम जोराचा ताप चढणे.
-डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे.
-डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते.
-स्नायू आणि सांध्यांमधे वेदना.
-चव आणि भूक नष्ट होणे.
-छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे.
-मळमळणे आणि उलट्या होणे.
-त्वचेवर व्रण उठणे.
डेंग्यूला दूर ठेवण्यासाठी हे करा
: कुलर, फुलदाणीतील पाणी तीन ते चार दिवसांनी बदलावे.
: घरांमध्ये कीटकनाशक फवारणी करावी.
: शौचालयाचे गॅस पाईप बारीक जाळीच्या कपड्याने झाकून ठेवावे.
: वाहनांचे जुने टायर नष्ट करावे.
: छतावरील पाण्याची टाकी झाकून ठेवावी.
: आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.
: विहिरीत किंवा पाण्याचा टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावे.
: झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
: संपूर्ण अंग झाकेल, अशा कपड्यांचा वापर करावा.