नागपूर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असताना ऑक्टोबर महिन्यापासून संख्येत घट आली. दिवाळीच्या काळात १५ व १६ नोव्हेंबर रोजी दैनंदिन रुग्णसंख्या १००च्या खाली होती. त्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच शहरातील रुग्णसंख्या ९९ वर आली. ग्रामीणमध्ये आज २६ नव्या रुग्णांची भर पडली. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी शहरात एक तर ग्रामीणमध्ये सात केंद्रे वाढविण्यात आल्याने केंद्रांची संख्या २० झाली.
नागपूर जिल्ह्यात आज ४९५९ कोरोना संशयितांच्या चाचण्या झाल्या. ३९५५ आरटीपीसीआर तर १००४ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. यातून १२८ बाधित रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या १,३२,५९४ झाली. जिल्ह्यात सहा रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांमध्ये शहरातील एक, ग्रामीण भागातील दोन तर जिल्ह्याबाहेरील तीन मृत्यू होते. मृतांची एकूण संख्या ४१३३ वर पोहोचली. सध्या ३४८१ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील २५८१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ९०० रुग्ण विविध रुग्णालयांत भरती आहेत. १९३ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १,२४,९८० झाली आहे.
-६१.०९ टक्के लसीकरण
सोमवारी नागपूर जिल्ह्यात ६१.०९ टक्के लसीकरण झाले. यात शहरात ६५.१३ टक्के तर ग्रामीणमध्ये ५८.८ टक्के झाले. शहरातील एम्स केंद्रावर ६० टक्के, मनपाच्या पाचपावली केंद्रावर ८४.५ टक्के, डागा रुग्णालयाच्या केंद्रावर ५३ टक्के, मेडिकल केंद्रावर ३४ टक्के, मेयोचा केंद्रावर १०९ टक्के तर आजपासून नव्याने सुरू झालेल्या मनपाच्या आयसोलेशन दवाखान्याच्या केंद्रावर ६२ टक्के लसीकरण झाले. ग्रामीणमध्ये पूर्वी हिंगणा, कामठी, काटोल, रामटेक, सावनेर, उमरेड व इसासनी या सातच केंद्रांवर लसीकरण होत होते. सोमवारी आणखी सात केंद्रांची भर पडली. यात भिवापूर, कळमेश्वर, कुही, मौदा, नरखेड, पारशिवनी व बोरखेडी केंद्राचा समावेश आहे.
-दैनिक संशयित : ४९५९
-बाधित रुग्ण : १३२५९४
_-बरे झालेले : १२४९८०
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३४८१
- मृत्यू : ४१३३