मोठा ताजबाग येथील घटना : आरोपींजवळून दोन माऊझर जप्त नागपूर : हिंगणघाट येथील दोन कुख्यात आरोपींनी बुधवारी नागपुरात पोलिसांवर गोळी झाडली. ही घटना दुपारी मोठा ताजबाग येथे घडली. हे दोन्ही आरोपी देशीकट्ट्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फरार होते. हिंगणघाट पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने त्यांना बुधवारी पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गोळी झाडली. तरीही पोलिसांनी आरोपींना सिनेस्टाईल अटक केली. तसेच दोन माऊजर जप्त केले. अवि नवरखेडे रा. शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट व शुभम रमेश लोंढे रा. हनुमान वॉर्ड हिंगणघाट अशी आरोपींची नावे आहेत.पोलीस सूत्रानुसार, अवि नवरखेडे व टिनू गवळी या दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये दारूच्या वादातून गत दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. टिनूच्या टोळीने दोन वर्षांपूर्वी येथील बाजार समिती (राष्ट्रीय महामार्गावरील)समोर दगडाने ठेचून रवीच्या टोळीतील कंठ्याची हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणात टिनू व त्याच्या ५-७ साथीदारांना अटक झाली होती. परंतु पुराव्याअभावी न्यायालयाने त्या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. तेव्हापासून टिनू व अविच्या टोळीतील संघर्ष टोकावर पोहचला आहे.अविने सहा महिन्यांपूर्वी टिनूचा भाऊ सोनूवर येथील उड्डाण पुलावर देशी कट्ट्यातून गोळी झाडली होती. सुदैवाने यातून सोनू बचावला. नंतर ७ एप्रिलला अविने साथीदारासह इनोव्हा कारने हिंगणघाटला येऊन राष्ट्रीय महामार्गावरील बाजार समितीसमोर सोनूवर देशी कट्ट्यातून पाचवेळा फायर केले. याही हल्ल्यातूनही सोनू बचावला. या घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसात होताच ठाणेदार नीलोत्पल यांनी घटनास्थळ गाठून पाच निकामी काडतुसे जप्त केली होती. तेव्हापासून हिंगणघाट पोलीस अवि व त्याच्या साथीदारांच्या मागावर होते. आरोपी अवि नवरखेडे याच्या भाचीचे बुधवारी नागपूर येथे लग्न होते. या ठिकाणी अवि येणार अशी माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळाली.
फरार आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
By admin | Updated: April 28, 2016 02:46 IST