लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : जंगलात लावलेल्या वणव्यामुळे शेतातील गाेठ्याला अचानक आग लागली. त्यात गाेठ्यातील शेतीपयाेगी अवजारे, बैलगाडी, गुरांचा चारा तसेच इतर साहित्य जळाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले. ही घटना इंदापूर (ता. भिवापूर) शिवारात मंगळवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास घडली.
लक्ष्मण माराेती तांगडे रा. इंदापूर, ता. भिवापूर यांची इंदापूर शिवारात शेती असून, शेतातच गुरांसाठी गाेठा आहे. शेतालगत असलेल्या जंगलात वन कर्मचाऱ्यांनी साफसफाई करण्यासाठी वणवा लावला हाेता. दरम्यान, वणवा पसरत जाऊन शेतातील गाेठ्याने पेट घेतला. काही क्षणातच आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्याने शेतात धाव घेतली. मात्र ताेपर्यंत गाेठ्यातील जनावरांचा चारा व शेतीपयाेगी साहित्य भस्मसात झाले हाेते.
या आगीमुळे गाेठ्यात ठेवलेला १,२०० पेंडी कडबा, कुटार, गाेठ्यातील इमला तसेच शेतीपयाेगी अवजारे, बैलगाडी आदी साहित्य जळून खाक झाले. तसेच एक बैल अंशत: भाजल्याने जखमी झाला. आगीच्या या घटनेमुळे लक्ष्मण तांगडे यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वनविभागाने भरपाई द्यावी, अशी मागणी अमाेल थुटे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.