वसीम कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात बंद पडलेले नॅशनल फायर सर्व्हिसेस काॅलेज (एनएफएससी) आता ४० कोटी रुपयांच्या खर्चातून कात टाकणार आहे. येत्या सहा महिन्यांत येथील कामे पूर्ण होणार असून, दोन नवीन अभ्यासक्रमांसह प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचा कल या महाविद्यालयाकडे वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोरोनाचे संक्रमण कमी होताच या महाविद्यालयात अर्बन सर्च अँड रेस्क्यू आणि स्टेशन ऑफिसर काेर्स या दोन नव्या अभ्यासक्रमांसह प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. कोरोना नियमांचे पालन करून अभ्यासक्रम सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथे अन्य अभ्यासक्रमांच्या शिक्षणाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. अग्निशमनसोबतच, मदत आणि बचाव कार्याच्या प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाची गरज आहे. आजपर्यंत अनेक अभ्यासक्रमांचे शिक्षण ऑनलाइन सुरू होते. आता येथे ऑनलाइन शिक्षण थांबविण्यात आले आहे. देशातील एकमेव असलेल्या या बीई फायर इंजिनियरिंग काॅलेज परिसरात टेक्निकल माॅडेलला मूर्त रूप देण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे.
कोट
कोरोना प्रतिबंधामुळे महाविद्यालयात वर्ग सुरू करण्यात आले नव्हते. आता क्रमाक्रमाने सुरुवात करण्यात आली आहे. दोन अभ्यासक्रम सुरू असून, अन्य दोन लवकरच सुरू केले जातील. सहा महिन्यांत कामेही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरच या महाविद्यालयाचे रूप पालटलेले दिसेल.
- देवेंद्र कुमार शम्मी, प्रभारी संचालक, एनएफएससी