लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील जयस्तंभ चाैक ते रेल्वेस्थानक मार्गालगत असलेल्या सराय झाेपडपट्टीतील घराला शनिवारी (दि. २५) रात्री १० वाजताच्या सुमारास आग लागली. शेजाऱ्यांनी घरातील मुलांना लगेच सुरक्षित बाहेर काढल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. घरमालकाने स्वत: घरे पेटवून दिल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
नागराज थूल (५०) याचे या झाेपडपट्टीत घर असून, त्याला दारूचे व्यसन असल्याने ताे शनिवारी रात्री दारू पिऊन घरी आला हाेता. त्याने घरातील साहित्यावर राॅकेल व डिझेल ओतले आणि स्वत: आग लावली. त्यावेळी घरात त्याची सासू आणि तीन नातवंडे हाेती. घराने पेट घेतल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी लगेच पाेलिसांना सूचना देत आतील महिला व नातवंडांना सुखरूप बाहेर काढले.
काही वेळात पाेलिसांसाेबतच कामठी नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे ही आग इतरत्र पसरली नाही. ताेपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळाले हाेते. ठाणेदारद्वय विजय मालचे व राहुल शिरे परिस्थितीवर नजर ठेवून हाेते. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी नागराजची सासू सावराबाई तळसे हिच्या तक्रारीवरून भादंवि ४३६ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.