लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : जिल्हा प्रशासनाने नागपूर शहर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लाॅकडाऊन जाहीर केले असून, साेमवार (दि. १५) याला सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत हिंगणा पाेलिसांनी नाकाबंदी करीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४३ जणांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून २३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.
नागपूर शहरासाेबतच हिंगणा शहर व पाेलीस ठाण्याच्या हद्दीत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हिंगणा पाेलिसांनी साेमवारी हिंगणा पाेलीस ठाणे व शहरातील बसस्थानकाजवळील शिवाजी महाराज चाैकात नाकाबंदी करून राेडने फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी केली. यात पाेलिसांना काही जण विना मास्क तर काही विना हेल्मेट व नियमाबाह्य सीट असलेल्या वाहनाने फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाेलिसांनी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
विना हेल्मेट व नियमबाह्य फिरणाऱ्यांकडून २० हजार ७०० रुपये तर विना मास्क फिरणाऱ्यांकडून २,४०० रुपये असा ४३ जणांकडून एकूण २३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती हिंगण्याचे ठाणेदार सारीन दुर्गे यांनी दिली. याबाबत पाेलिसांकडून जनजागृती केली जात असून, ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे हिंगणा शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण दुकाने व बाजारपेठ बंद हाेती.