लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या व अखेरच्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३५ जागांवर ७७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. २ मे रोजी निकाल जाहीर होणार असून, ममतांच्या तृणमूलची जादू कायम राहणार की भाजपच्या नियोजनामुळे त्यांचा खेला होबे होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अखेरच्या टप्प्यात बीरभूम, कोलकाता उत्तर, मुर्शीदाबाद, मालदा या जिल्ह्यातील ३५ जागांवर निवडणूक पार पडली. बीरभूम व कोलकाता उत्तर येथे सर्वात जास्त हिंसाचार झाला. भाजपच्या उमेदवार मीना देवी पुरोहित यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. तर इंटाली येथून भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबडेवाल यांनी कोलकाता पोलिसांनी पाठलाग केल्याचा आरोप लावला. बीरभूम येथील नानूर येथे मतदानाअगोदर बॉम्बस्फोट झाल्याची घटना झाली. काही मतदारसंघात तणाव असला व कोरोनाचा संसर्ग असला तरी मतदारांनी मतदान केले.
तृणमूलचा परत निवडणूक आयोगावर निशाणा
तृणमूल काँग्रेसतर्फे परत एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मतगणना कक्षात प्रवेश करणाऱ्या उमेदवार व त्यांच्या एजंटांना कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी व मतगणना केंद्रांवर तैनात केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआरची अट अनिवार्य का केली नाही, असा सवाल तृणमूल काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्रदेखील सोपविण्यात आले आहे.
असे झाले बंगालमध्ये मतदान
टप्पा – मतदान
पहिला टप्पा – ८४.१३ टक्के
दुसरा टप्पा – ८६.११ टक्के
तिसरा टप्पा – ८४.६१ टक्के
चौथा टप्पा – ७९.९० टक्के
पाचवा टप्पा – ८२.४९ टक्के
सहावा टप्पा – ८२ टक्के
सातवा टप्पा – ७९.९० टक्के
आठवा टप्पा – ७७ टक्के (अंतिम घोषणा शुक्रवारी)