काटोल : काटोल नगरपरिषदेला मुख्याधिकारी नसल्याने प्रभारी मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी होती. जिल्हाधिकारी यांनी ही मागणी पूर्ण करीत नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाची सूत्रे तहसीलदार अजय चरडे यांच्याकडे सोपविली आहे.
तहसीलदारांनी प्रभार स्वीकारताच काटोल पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. अवैध गुंठेवारी प्रकरणापासून काटोल न. प. चा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मधल्या काळात तत्कालीन मुख्याधिकारी अशोक घराटे यांची बदली झाली. नगरपालिकेच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून नरखेडच्या मुख्याधिकाऱ्यांना काटोलचा प्रभार सोपविण्यात आला. याच दरम्यान नगर रचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. काटोल पालिकेतील कारभार पाहता नरखेडच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रभार काढून घेण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ती मान्य करण्यात आल्यानंतर तहसीलदार चरडे यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला. चरडे यांनी तहसील कार्यालयातील कामाचा व्याप लक्षात घेता न.प.चा प्रभार स्वीकारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे मागील दोन दिवस पालिका मुख्याधिकाऱ्याविना होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. अखेर चरडे यांनी न.प.चा प्रभार स्वीकारला.