बैद्यनाथमध्ये धन्वंतरी जयंती महोत्सव : स्वास्थ्य दिवस समारंभनागपूर : श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा. लिमिटेडच्या वतीने धन्वंतरी जयंती महोत्सव आणि स्वास्थ्य दिवस समारंभाचे आयोजन बैद्यनाथ चौक येथील कंपनीच्या परिसरात सोमवारी उत्साहात करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून डॉ. रामेश्वर पांडे उपस्थित होते. वैद्यांचा सत्कारसमारंभात आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये पुणे येथील वैद्य सर्वेश अजित कुळकर्णी व साधना बबेल, रायपूर येथील हरिंद्र मोहन शुक्ला, इंदूर येथील सोमेंद्र मिश्रा आणि जबलपूर येथील राजेंद्रकुमार गुप्ता यांचा समावेश आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा यांनी सांगितले की, कंपनीतर्फे आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनांसह सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करण्यात येते. १९७९ मध्ये सर्वप्रथम वैद्य रामनारायण शर्मा यांनी आयुर्वेद आणि वैद्यांना पुरस्कार देण्यासाठी पं. रामनारायण शर्मा आयुर्वेद अनुसंधान न्यासची स्थापना केली. दरवर्षी श्रेष्ठ ग्रंथ लेखक आणि श्रेष्ठ वैद्याला एक लाख रुपये आणि भगवान धन्वंतरीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करणे, हा यामागील मुख्य उद्देश होता. सध्या ही रक्कम वाढवून २ लाख ५० हजार रुपये केली आहे. हा पुरस्कार २००८ मध्ये दिल्ली येथील वैद्य विवेकानंद पांडे यांना, वर्ष २००९ मध्ये पुणे येथील दिवंगत रामचंद्र बल्लाळ गोगटे यांना, वर्ष २०१० करिता बेंगळुरू येथील वैद्य जयप्रकाश नारायण आणि वर्ष २०११ करिता बनारस येथील वैद्य गोविंद प्रसाद दुबे यांना देण्यात आला. डॉ. रामेश्वर पांडे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचा प्रारंभ भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन आणि आरतीने झाला. (वा.प्र.)
उल्लेखनीय कार्यासाठी वैद्यांचा सत्कार
By admin | Updated: November 10, 2015 03:40 IST