१७ लाखांचा साठा जप्त : आरोग्यावर विपरीत परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हर्बालाईफच्या गोडावूनवर अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी धाड टाकून १७ लाख रुपयांची उत्पादने जप्त केली. नागपुरात मोठ्या प्रमाणावर विविध न्यूट्रास्युटिकल, हेल्थ सप्लीमेंट, फूड सप्लीमेंट तसेच खेळाडू व अॅथ्लिट मोठ्या प्रमाणात न्यूट्रास्युटिकलचे सेवन करीत आहेत. त्याच्या सेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या उत्पादनात नॅशनल अॅन्टी-डोपिंग एजन्सीला उत्तेजकांचे प्रमाण आढळून आल्याने हर्बालाईफच्या उत्पादनाविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम राबविली. २० जून रोजी हर्बालाईफ इंटरनॅशनल इंडिया प्रा.लि.च्या रॉयल हाऊस, गजानननगर येथील गोडावूनवर धाड टाकून हेल्थ सप्लीमेंट (पर्सन्लाईज्ड प्रोटीन पावडर), प्रॉपर्टी फूड प्रॉडक्ट (न्यूट्रीशनल शेक मिक्स) आणि न्यूट्रास्युटिकल (हर्बल कंट्रोल) या अन्न पदार्थांचे नमुने घेतले. अन्न सुरक्षा व मानके कायदा-२००६ च्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याच्या संशयावरून १६ लाख ८३ हजारांचा साठा जप्त केला. नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर विभागात विशेष मोहीम राबवून २० जूनला चार नमुने घेण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण उमप, सीमा सुरकर आणि किरण गेडाम यांनी केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. ग्राहकांना न्यूट्रास्युटिकल उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयात मिलिंद देशपांडे यांच्याकडे तक्रार करता येणार आहे.
हर्बालाईफच्या उत्पादनांवर एफडीएची धाड
By admin | Updated: June 22, 2017 02:14 IST