नागपूर : सोयाबीन मिल्कचे जनक म्हणून ओळख असलेले प्रख्यात संशोधक डॉ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवारी, २७ जुलै रोजी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नागपुरातील अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोयाबीनपासून दुधाची निर्मिती होऊ शकते, यावर संशोधन करून ते अमलात आणणारे डॉ. शांतीलाल कोठारी हे पहिले आहेत. देशातील पहिला सोयाबीन मिल्कचा कारखाना नागपुरात पंचशील चौक येथे सुरू करण्याचा मान त्यांनाच जातो. यासोबतच महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षे घातलेली लाखोळी डाळीवरील बंदी डॉ. कोठारी यांच्याच प्रयत्नाने उठविण्यात आली. लाखोळी डाळ ही शरीरासाठी कशी उपयुक्त आहे, यावर संशोधन करून ते सिद्ध करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्या या प्रयत्नाने धानपट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मोहफुलावर शासनाने घातलेली बंदी उठविण्यासाठीचा लढा डॉ. कोठारी यांनी पूर्वीपासूनच दिला. मोहफुलाला केवळ दारूसाठी बदनाम करू नका, त्याचे अनेक आरोग्यदायी लाभ आहेत, असे ठासून सांगण्यात त्यांनी कसलीही कुचराई केली नाही. त्यांच्याच लढ्याचा एक भाग म्हणून शासनाने मोहफुलावरील बंदी मागे घेतली आणि त्यासाठी बाजार मोकळा केला आहे. कृषीविषयक संशोधनासोबतच त्यांचे सामाजिक कार्यातील योगदानही मोठे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल आणि विदर्भ सहायक समितीच्या अनाथ मुलांसाठी असलेल्या बालसदनचे ते कार्यकारिणी सदस्य होते. शहरातील धार्मिक व जातीय तेढ दूर करण्यासाठी स्थापन झालेल्या नागपूर नागरिक शांतता समितीचे ते सदस्य होते. अनेक प्रकरणात त्यांनी मध्यस्ती करून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागपूरचे सजग प्रहरी म्हणून ते ओळखले जात हाेते.
............