लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी १ जानेवारीपासून फास्टटॅगने सर्व पथकर स्वीकारला जाणार आहे. जीपीएस प्रणाली येत्या दोन वर्षात संपूर्ण देशभर लावली जाणार आहे. त्यामुळे कुठेही पथकर केंद्र राहणार नाही. पथकराची रक्कम संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यातून वळती केली जाईल. २० रुपयापासून आतापर्यंत २ कोटी १६ लाख फास्टटॅग जारी करण्यात आले आहेत, असे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्गांच्या ८५०० कोटींच्या १८ योजनांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते पार पडले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोद, राज्यमंत्री डॉ. व्ही. के.सिंग, अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र शेखावत, कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होते.
रस्ते चांगले बनले तरच पर्यटक अधिक येऊन पर्यटनाला चांगला वाव मिळेल. परिणामी रोजगाराच्या संधी वाढतील. राजस्थानमध्ये पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने बहुतांश जिल्ह्यांमध्ये वाव आहे. खासदार आणि आमदारांनी दिलेले महामार्गांचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले असून काही रस्त्यांच्या बांधकामात भूसंपादनाच्या व अतिक्रमणाच्या अडचणी राज्य शासनाने सोडवाव्या. त्यशिवाय ही कामे सुरू होणार नाही, असेही ते म्हणाले.
बॉक्स
सर्वच क्षेत्रात नवीन संशोधनाची गरज
आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी देशातील सर्वच क्षेत्रात नवीन संशोधनाची गरज आहे. विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या भागात कोणत्या क्षेत्रात संशोधनाची गरज आहे, याचा अभ्यास करून नवीन संशोधन व्हावे. त्यामुळेच अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत मिळेल आणि मागास भागातील सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०२० या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.