कळमेश्वर : तालुक्यातील पिल्कापार शिवारातील तलाव व त्याच्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेली. या कामांची पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे यांनी नुकतीच पाहणी केली. तलावात मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध हाेणार असल्याची माहिती श्रावण भिंगारे यांनी दिली.
कळमेश्वर तालुक्यातील बहुतांश तलावांची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात न आल्याने ते माेडकळीस आले हाेते, शिवाय त्यात गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवण क्षमताही कमी झाली हाेती. यातील बहुतांश तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, पिल्कापार शिवारातील तलाव व त्याच्या कालव्यांच्या दुरुस्तीचे कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे यांनी यासह अन्य तलावांना भेटी देऊन पाहणी केली.
यात त्यांनी पिल्कापार शिवारातील तलावाची रिशेलिंग, गेट फिक्सेशन, बेस्ट वेअर यासह कालव्यांच्या कामांची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांना या रबी हंगामात सिंचनासाठी पाणी हवे आहे, त्यांनी मागणी नाेंदवावी, असेही श्रावण भिंगारे यांनी सांगितले असून, तालुक्यातील तिष्टी-१, तिष्टी-२, झिल्पी शिवारातील पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी लघु पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना अन्य तलावांचे खाेलीकरण, दुुरुस्ती, कालव्यांची साफसफाई व दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या.