भिवापूर तालुक्यातील प्रकार : पावसाने दडी मारल्याने फसगतभिवापूर : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाच्या सरींमुळे भिवापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारली. त्यामुळे ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी या पिकांना डब्याने पाणी देणे सुरू केले आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात उमरेड उपविभागातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. आता पाऊस येणार, असे समजून भिवापूर तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. जमिनीत थोडीफार ओलावा असल्याने सदर बियाणे अंकुरले. त्यातच पावसाने दडी मारली. उन्हामुळे पिकांचे अंकुर कोमेजण्याची पर्यायाने पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. ज्यांच्या शेतात ओलिताची सुविधा आहे, त्यांनी या पिकांना विहिरीचे पाणी देत पिके जगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, ज्यांच्या शेतात ओलिताचे कुठलेही साधन नाही, त्यांनी दूरवरून ड्रम अथवा अन्य साधानाने शेतात पाणी आणले आणि मजुरांकरवी डब्याच्या साहाय्याने या पिकांना पाणी देत पिके जगविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काहींनी धानाचे पऱ्हेही टाकली. मात्र, पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने रोवणे थांबले आहेत. कपाशीचे पीक जगविण्यासाठी काही शिवारात महिला डोक्यावर गुंड घेऊन येताना दिसून येते. या पिकांना डब्याने पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत पाणी देण्याचे काम सुरू असते. घरातील कर्ता पुरुष विहिरीतून बादलीने पाणी काढतो तर, महिला हंड्याने शेतापर्यंत पोहचवतात. भारनियमनामुळे विहिरीत पाणी असूनही पिकांचे ओलित करणे शक्य होत नसल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. आठवडाभर जर पाऊस बरसला नाही तर, यातील अनेकांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या हंगामातील पिके अतिवृष्टी व गारपिटीने उद्ध्वस्त केलीत. शेतकऱ्यांनी जवळ असलेला पैसा खर्च करून पेरणी केली. त्यातच पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ उद्भवल्यास ती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना सतावत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By admin | Updated: July 7, 2014 01:07 IST