माजी आमदाराची फेक फेसबुक आयडी
पैशाची मागणी : लोकमतच्या वृत्तामुळे टळली फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी आमदार अनिल सोले यांची बनावट फेसबुक आयडी तयार करून त्यांच्या मित्रांना सायबर गुन्हेगाराने पैशाची मागणी केली हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर सोले यांनी पोलिसांकडे संपर्क साधला.
सोले यांची नोवेंबर २०२० मध्ये अशाच प्रकारे फेक फेसबुक आयडी तयार करून त्यांच्या मित्रांना पैशाची मागणी करण्यात आली होती. त्यासंबंधाने सोले यांनी सायबर सेलमध्ये तक्रारही केली होती. आता परत सहा महिन्यांनी सायबर गुन्हेगाराने सोले यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यांच्या मित्रांना पैशाची गरज असल्याचा मेसेज पाठवला.
विशेष म्हणजे, ''लोकमत''ने फेसबुक वरून पैशाची मागणी होत असेल तर सावधान !असे वृत्त १९ मे रोजी प्रकाशित केले आहे. या वृत्तामुळे सतर्क झालेल्या सोले यांच्या मित्रांनी रविवारी सकाळी त्यांच्याशी संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सोले यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली.
विशेष म्हणजे, कठोर कारवाई होत नसल्यामुळे सायबर गुन्हेगार चांगलेच निर्ढावले असून त्यांनी नागपुरातील डॉक्टर, वकील, पत्रकार, राजकीय नेते आणि खुद्द पोलीस आयुक्तांच्याही नावे बनावट फेसबुक आयडी तयार करून पैशाची मागणी केली आहे.
या गैरप्रकारची दखल घेऊन ''लोकमत''ने १९ मे च्या अंकात ''फेसबुक वरून पैशाची मागणी होत असेल, तर सावधान !''
अशा आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. लोकमतच्या वृत्तामुळेच सोले यांच्या मित्रांनी त्यांना संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
---