नागपूर : दिघोरी येथील साईनगरातील राघोर्ते यांच्या घराच्या अंगणात गुरुवारी पहाटे पांढराशुभ्र रंगाचा अति दुर्मिळ अल्बीनो तस्कर साप आढळून आला. काँक्रिटच्या खाली शिरलेला हा साप एक तासाच्या परिश्रमानंतर सर्पमित्र अभिषेक देवगिरीकर, प्रतीक वाघमारे यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आला. सुमारे एक फूट लांबीचा हा साप होता. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बिनविषारी असून इंग्रजीत त्याला त्रिंकेट स्नेक म्हणतात. अल्बीनो तस्कर साप अत्यंत दुर्मिळ असून दिसायला सुंदर असतो. डोळे लाल-गुलाबी असतात. अल्बीनो तस्कर साप ही वेगळी जात नसून डीएनएमध्ये विशेष बदल झाल्याने त्याची त्वचा पांढरी पडत असते. शरीरातील मेलॅलीन प्रमाण कमी झाल्याने सापाच्या त्वचेचा रंग हळूहळू फिक्कट पडत जातो व पुढे त्वचा पांढरी होत जाते. अल्बीनिझम ही अनुवांशिक घटना असते. जन्म होण्याच्या वेळी अंडी यांना मिळणारी ऊब तसेच वातावरणातील बदलामुळे अंड्यातील सापांमध्ये रंगद्रव्याचा अभाव होतो, त्यामुळे सापाची त्वचा पांढरी होते.
दिघोरी परिसरात आढळला अति दुर्मिळ अल्बीनो तस्कर साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST