ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 6 - कोराडीजवळच्या तुली पब्लिक स्कूलमधील गरीब आदिवासी विद्यार्थिनींसोबत लज्जास्पद चाळे करून तेथील एक कर्मचारी (आचारी) त्यांचे शोषण करीत होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जमीर बापत्ती शहा (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. कोराडी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत निरीक्षणासाठी भेट दिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणात लपवाछपवीची भूमिका स्वीकारल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कोराडी (नाका) बोखारा परिसरात ही शाळा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या काही गरीब आदिवासी मुली वसतिगृहात राहतात. तेथे स्वयंपाकी (आचारी) म्हणून कार्यरत असलेला जमीर नामक नराधम शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लज्जास्पद कृत्य करीत होता. त्याच्याविरुद्ध बोलण्याची सोय नसल्यामुळे आणि तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे मुली तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा, तसा आरोपी जमीरकडून होणारा त्रास सहन करीत होत्या. बुधवारी दुपारी शिक्षणाधिकाऱ्याचे एक पथक शाळेच्या निरीक्षणासाठी गेले. तेथे काही मुलींनी त्यांच्याकडे कैफियत मांडली. या प्रकारामुळे हादरलेल्या शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या पथकाने तुली स्कूलच्या प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणात आरोपी जमीरलला काढून टाकल्याचे सांगितले. पोलिसांकडे तक्रार का केली नाही, या प्रश्नावर शाळा प्रशासनाने चुप्पी साधल्याचे समजते. दरम्यान, पाच ते सात मुलींनी तोंडी आणि लेखी तक्रार केली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिक्षणाधिकाऱ्यांतर्फे डी. एस. पगाडे यांनी कोराडी ठाण्यात गुरुवारी सायंकाळी तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचे कलम ३५४(अ) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण सहकलम ७, ८, ११, १२ अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंंदविला. आरोपी जमीर पानखेडा (ता. मंगरूळ, जि. वाशिम) येथील रहिवासी असून, तो गेल्या काही दिवसांपासून शाळेतच राहात होता. पोलिसांनी त्याला गुरुवारी दुपारी अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांचा तपास दडपणात?या प्रकरणाचा तपास करणारे कोराडी पोलीस दडपणात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. कोराडीचे ठाणेदार कदम सध्या सुटीवर आहेत. त्यांचा पदभार पी. आय. वड्याळकर हे सांभाळत आहेत. या प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे यांनी गुन्हा दाखल केला. वड्याळकर यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी बरेच आढेवेढे घेतले. पीडित विद्यार्थिनी आदिवासी समाजाच्या आहेत. त्यामुळे आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. या गंभीर प्रकरणात मात्र तसे झाले नाही. यामागचे कारण काय, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ह्यहळू हळू सर्व करूह्य, असे ते म्हणाले. किती महिन्यांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता, त्याचीही माहिती देण्याचे त्यांनी टाळले, एवढेच नव्हे तर आरोपीची पोलीस कोठडी मिळाली काय, अशी विचारणा केलीी असता अद्याप ते कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. माहिती देण्यासाठी एवढे आढेवेढे का घेतले जात आहे, अशी विचारणा केली असता प्रकरण गंभीर असल्यामुळे माहिती देणे योग्य होणार नसल्याचे वड्याळकर म्हणाले.
तुली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींचे शोषण
By admin | Updated: January 6, 2017 22:08 IST