नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वेगाडीत बॉम्ब असल्याची रेल्वे कंट्रोल रूमला आज दुपारी माहिती मिळाली आणि रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी संबंधित गाडीची कसून तपासणी केली असता बॉम्ब ऐवजी गांजा असलेली बेवारस बॅग आढळली.
ट्रेन नंबर १२८४३ पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवून असल्याची माहिती रेल्वे कंट्रोल रूमला आज मिळाली. त्यामुळे कंट्रोलने रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस तसेच सुरक्षा दलाच्या जवानांना अलर्ट दिला. त्यानुसार, रेल्वेगाडीत तपासणी सुरू झाली. दरम्यान गाडी भंडारा स्थानकावर पोहचली. तेथे सुरक्षा जवानांना एस-७ कोचमध्ये काळ्या-लाल रंगाची एक बेवारस बॅग दिसली. तिची तपासणी केली असता त्या बॅगमध्ये गांजा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. त्यानंतर रेल्वेगाडी नागपूर स्थानकावर आली. येथे रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी प्रत्येक कोचची कसून तपासणी केली. मात्र काहीही आढळले नाही.