नागरिकांचे आरोग्य धोक्यात : २०० रुपये दंड नावापुरताच
नागपूर : कितीही जीवघेणे इशारे असले, निर्बंध असले आणि कारवाईची भीती असली तरी धुम्रपान करणे हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. ताणतणावाचे कारण पुढे करून आणि प्रतिष्ठा म्हणून अनेकजण सिगारेटचा धूर सोडतात. मात्र, हा सिगारेटचा धूर जीवघेणा असल्याचे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आकडेवारीवरून पुढे आले आहे. राज्यातही सार्वजनिक स्थळांवर धुम्रपान करण्यावर बंदी आहे. त्यासाठी २०० रुपये दंडही आकारला जातो. मात्र, हा दंड आकारण्यासाठी नियमित कारवाई होत नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सर्रास नागरिक धुम्रपान करीत असल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक स्थळे म्हणजे बसस्टॅण्ड, शाळा-महाविद्यालय, रुग्णालय, उद्यान आणि अन्य गर्दीची ठिकाणे होत. येथे बिडी, सिगारेट ओढणे गुन्हा आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा विषय गंभीर आहे. मात्र, धुम्रपान करणाऱ्यांकडून नियमांचा भंग करण्यात येतो. खरेदी केली की तेथेच सिगारेट ओढण्यात येते. अनेकदा तर सार्वजनिक स्थळांवरही अनेकजण धुम्रपान करीत असल्याचे दिसते. त्यांना मनाई करण्याची हिंमत कुणीच करीत नाही. ‘लोकमत’च्या चमूने पाहणी केली असता शहरातील रामदासपेठ, काचीपुरा भागात, व्हीआयपी रोड, वर्धा रोड आणि धरमपेठ परिसरात तसेच बसस्थानकावरील रसवंतीत नागरिक धुम्रपान करताना आढळले. सार्वजनिक ठिकाणी नागरिक धुम्रपान करीत असल्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची गरज आहे.
.........
कारवाईची आकडेवारीच नाही
बसस्थानकावर धुम्रपान करणाऱ्या किती जणांवर कारवाई करण्यात आली, याची आकडेवारी एसटी महामंडळाकडे नाही. अशीच स्थिती अन्न व औषध प्रशासन विभागाचीही आहे. धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी ही पूर्णत: अन्न व औषध प्रशासनाची आहे. संबंधित सार्वजनिक स्थळांचे प्रशासनही त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणी धुम्रपान करीत असल्याचे दिसल्यास कारवाई करू शकते.
धुम्रपानावर नियंत्रण कसे मिळणार
धुम्रपान करणारा कुणी आढळलाच तर एखादवेळी संबंधित स्थळाचा सुरक्षारक्षक त्यास फटकारतो. बरेचदा त्यांच्याशी धुम्रपान करणारा व्यक्ती हुज्जतबाजी करतो. कधीकधी तर धमकावलेही जाते. अशा स्थितीत कुणीच त्यांना हटकण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे सार्वजनिक स्थळी धुम्रपान करणारे बिनधास्तपणे धुम्रपान करताना दिसतात.
एसटीतर्फे होते कारवाई
‘बसस्थानकावर धुम्रपान करताना एखादी व्यक्ती आढळल्यास त्यास मनाई करण्यात येते. याबाबतच्या सूचना सुरक्षा रक्षक तसेच बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येते.’
-अनिल आमनेरकर, आगारप्रमुख गणेशपेठ आगार
सार्वजनिक स्थळी धुम्रपान करणे गुन्हा
‘सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामुळे इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येते.’
-वीरसेन तांबे, उपद्रव शोध पथक प्रमुख, महानगरपालिका
.............
इतरांच्या आरोग्यावरही होतो परिणाम
धुम्रपान करणाऱ्याचे फुफ्फुस, हृदय, मेंदू आणि संपूर्ण शरीर प्रभावित होते. त्यांच्या जवळपास असणारे नागरिकसुद्धा दमा, अस्थमा, फुफ्फुसाच्या आजारांनी ग्रस्त होतात. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हटले जाते. या विरोधात कठोर कारवाई गरजेची आहे. तरच धुम्रपानावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल. नागरिकांनीही स्वत: सजग असणे गरजेचे आहे.
- डॉ. विक्रम राठी, हृदयरोग विशेषज्ञ
..........