आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाचा पुढाकार नागपूर : चीननंतर भारत मधुमेहाची उपराजधानी ठरत आहे. एकट्या भारतात ७० लाख लोक मधुमेहाने पीडित आहेत. बदललेली जीवनशैली, अनियंत्रित आहार, व्यायामाचा अभाव, अनुवांशिकता ही मधुमेहाची कारणे आहेत. हा आजार वेळीच नियंत्रित ठेवल्यास याच्या दुष्परिणामापासून वाचता येते. यासाठी शिक्षकांमधून या आजाराची जनजागृती करण्यासाठी त्यांची मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांनी दिली. मधुमेहावर मात करण्यासाठी आयुर्वेद रुग्णालयाने पुढाकार घेतला असल्याचे सांगून डॉ. मुक्कावार म्हणाले, मधुमेहाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. शिक्षक या आजाराविषयी अधिक प्रभावीपणे जनजागृती करू शकतात. विद्यार्थ्यांना आजाराविषयी माहिती देऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला शहर व जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व हायस्कूलमध्ये कार्यरत १६०० शिक्षकांची मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. ७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सुरुवातीला नागपुरातील लोकांची शाळा, नवजीवन विद्यालय यासह एकूण तीन शाळांमधील शिक्षकांची तपासणी करण्यात येत आहे. या शिबिरात आतापर्यंत १५४० रुग्ण तपासले असून, त्यात ६० टक्के नवीन मधुमेही रुग्ण आढळून आले. याशिवाय शासनातर्फे राज्यभरातील शासकीय, खासगी व अनुदानित अशा एकूण ७० आयुर्वेद रुग्णालयांना दरवर्षी ३००० रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट दिले आहे. वर्षभरात एकूण २ लाख १० हजार रुग्ण तपासले जाणार आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या मधुमेहाची तपासणी करणार
By admin | Updated: April 3, 2017 03:04 IST