विद्यापीठाचे ‘एमकेसीएल’ला ‘गो अहेड’: ‘रोबोटिक्स सेंटर’ला मंजुरीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’दरम्यानचा सामंजस्य करार कायम राहणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. गेल्या कित्येक वर्षांत विद्यार्थ्यांसाठी साधे माहिती केंद्रही उभारू न शकलेल्या विद्यापीठाला काही मोफत सेवा पुरविण्याची ‘एमकेसीएल’ने तयारी दाखवली आहे. त्यात विद्यापीठाच्या परीक्षांसोबत इतर बाबींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘मोबाईल अॅप’चादेखील समावेश आहे.‘एमकेसीएल’च्या थकीत देयकांवरून बराच वाद निर्माण झाला होता. या देयकांबाबत व्यवस्थापन परिषदेचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. या समितीच्या शिफारशी व ‘एमकेसीएल’च्या अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा यांची माहिती सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत मांडण्यात आली. या समितीच्या शिफारशींनुसार ‘एमकेसीएल’ ला साडेतीन कोटींऐवजी १ कोटी ४७ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘एमकेसीएल’लादेखील हे मान्य असल्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले. दरम्यान, ‘एमकेसीएल’सोबत २००७ साली झालेला सामंजस्य करार पुढे सुरू ठेवण्यासदेखील व्यवस्थापन परिषदेने संमती दिली. परीक्षेच्या अगोदरची व नंतरची सर्व कामे ‘एमकेसीएल’कडे सोपविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून ते पदवी प्रमाणपत्र जारी करण्यापर्यंतच्या प्रक्रियांचा समावेश आहे. केवळ उत्तरपत्रिका ‘स्कॅनिंग’ व ‘आॅन स्क्रीन’ मूल्यांकनासाठी विद्यापीठाला बाहेरील एजन्सीची मदत घ्यावी लागणार आहे, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. दरम्यान, यामुळे परीक्षेचे काम सांभाळणाऱ्या ‘प्रोमार्क’ची विद्यापीठातून गच्छंती होणार आहे.माहिती केंद्राची सेवा पुरविणार‘एमकेसीएल’कडून काही सेवा मोफत पुरविण्यात येणार आहेत. यात ‘मोबाईल अॅप’तर विकसित करण्यात येईलच. हे ‘अॅप’ असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रवेश घेतल्याक्षणापासून विद्यापीठाची विविध माहिती व संदेश उपलब्ध होणार आहेत. शिवाय विद्यापीठाचे संकेतस्थळदेखील ‘एमकेसीएल’कडून नियंत्रित करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘कॅम्पस’मध्ये अद्ययावत माहिती केंद्रदेखील पुरविण्यात येणार आहे. येथे फोनवरूनदेखील विद्यार्थी विद्यापीठाचे विविध विभाग, प्रवेशप्रक्रिया इत्यादींची माहिती घेऊ शकणार आहेत.
मोबाईल ‘अॅप’वर परीक्षांची माहिती
By admin | Updated: July 21, 2015 03:16 IST