नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून वाटप करण्यात आलेल्या जास्तीत जास्त सायकली ह्या शिक्षण सभापतींनी आपल्याच सर्कलमध्ये वळविल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला होता. त्यांनी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनाही डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात अध्यक्षांच्या दालनात सुरू असलेल्या पत्रपरिषदेत सभापतींना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी सांगितले की, ‘मी सभापती आहे, काय झाले जास्त सायकली घेतल्या तर?’ त्यांच्या या उत्तराने उपस्थित पदाधिकारीही अवाक् झाले.
जिल्हा परिषदेद्वारे विविध योजना राबविल्या जातात. त्यात शिक्षण विभागात सेस फंड योजना २०२०-२१ अंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाची योजना आहे. त्या अंतर्गत नागपूर पंचायत समितीमधील ९७ लाभार्थींची निवड करण्यात आली. यात ४८ विद्यार्थिनी व ४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र नागपूर पंचायत समितींतर्गत जिल्हा परिषदेचे सहा सर्कल येतात. सेस फंडाच्या योजनेसाठी सहाही सर्कलच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या नावाचे प्रस्ताव शिक्षण समितीकडे पाठविले होते. परंतु सभापतींनी लाभार्थींची निवड करताना इतर सदस्यांना ठेंगा दाखविला. निवड करताना ९७ लाभार्थींपैकी ८९ लाभार्थी त्यांच्या सोनेगाव निपानी सर्कलमधील आहे.
मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी बघून भाजपचे सदस्य सुभाष गुजरकर यांनी आक्षेप घेतला होता. त्याचे प्रतिबिंब जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीपूर्वी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत उमटले. या विषयावर जिल्हा परिषदेचे वातावरण येत्या दिवसांत चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहे.