लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी एकीकडे सर्वत्र व्हॅलेन्टाईनची धूम होती. तर दुसरीकडे याच दिवसाचे निमित्त साधून ठरवण्यात आलेल्या एका लग्नाने लक्ष वेधून घेतले. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्यात आले. तर जाताना प्रत्येकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित जातींचे निर्मूलन हा ग्रंथ भेट देण्यात आला. त्यामुळे वर-वधूला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणासोबतच बौद्धिक पाहुणचारही मिळाला. रामटेके व बागड़े परिवारातील हा लग्नसोहळा साधा पण आगळावेगळा ठरला.
यशवंत बागडे हे सेवानिवृत्त स्पेशल डिस्ट्रीक्ट ऑडिटर आहेत. ते एक सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांची मुलगी डॉ. तेजस्विनी बागडे या एम.डी. अनेस्थेशिया आहेत. डॉ. तेजस्विनी यांचे अंकित रामटेके यांच्यासोबत लग्न ठरले. अंकित हे व्हीएनआयटी येथून इंजिनियर झाले असून ते सध्या बंगलोरला नोकरी करतात. आपल्या मुलामुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे, अशी प्रत्येक पालकाचीच इच्छा असते. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेप्रमाणे ते करण्याचा प्रयत्नही करतो. अशीच इच्छा यशवंत बागडे यांचीही असणारच. परंतु ते सामाजिक चळवळीतील संवेदनशील व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी जरा वेगळाच विचार केला होता. रविवारी १४ फेब्रुवारी रोजी लग्न पार पडले. लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्यात आले तर परत जातांना प्रत्येकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत जातीचे निर्मूलन हे ऐतिहासिक पुस्तक भेट देण्यात आले.
या लग्नात नागालॅण्डचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस संदीप तामगाडगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ कांबळे, माजी शिक्षणाधिकारी एन.ए. ठमके, सुधीर शंभरकर, विकास गडपायले आदी सहभागी झाले होते. त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.