नागपूर : दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढूनही अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये पूर्ण उपस्थितीमध्ये काम सुरू आहे. यामुळे कर्मचारी धास्तावले असून मार्च एण्डिंगचे कारण देत अनेक कार्यालये दिवस पुढे ढकलत असल्याचे चित्र आहे.
येथील सिव्हिल लाइन्स परिसरातील आयकर भवनामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सुमारे १५० कर्मचारी या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यातील २० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अनेकांनी टेस्ट केली असून अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह येऊनही कसलीही कार्यवाही झालेली नसल्याने येथील कर्मचारी दहशतीमध्ये आहेत. उपस्थितीवर मर्यादा असली तरी मार्च एण्डिंगमुळे येथे कामाची धावपळही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
या परिसरातील सराफ चेंबर्समध्येही २५ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. येथे ५० ते ६० कर्मचारी कार्यरत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करून येथे बोर्ड लावला आहे. कार्यालयही सॅनिटाईज करण्यात आले आहे. येथील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात आणि अजब बंगला कार्यालयातही १०० टक्के उपस्थितीवर काम सुरू असल्याची माहिती आहे. येथील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ५० टक्के उपस्थितीवर तसेच कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड बोलावून काम देण्याची विनंती येथील स्टाफने केली. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे.