नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नागपुरातील गौरव विनोद गाढवे (वय ३५) या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यासाठी बुलडाणाच्या पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश दिला. तसेच, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईचा दोन आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे सांगितले.
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात गौरवची आई रेखा गाढवे यांनी याचिका दाखल केली आहे. गौरव अचानक बेपत्ता झाल्यामुळे रेखा यांनी ९ एप्रिल २०१९ रोजी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती; परंतु इमामवाडा पोलिसांनी गौरवचा शोध घेतला नाही. दरम्यान, ११ एप्रिल २०१९ रोजी शेगाव पोलिसांनी रेखा यांना फोन करून गौरव त्यांच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. तसेच, गौरवला परत घेऊन जाण्यास सांगितले. त्यावेळी गौरवला जबर मारहाण केली जात होती. रेखा या शेगावला गेल्या असता पोलिसांनी गौरवला सोडून दिल्याचे सांगितले. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी रेखा यांना फोन करून गौरवचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. पोलिसांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळे रेखा यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या, पण त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. शेवटी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. इमामवाडा, शेगाव (बुलडाणा) व बाळापूर (अकोला) येथील जबाबदार पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले.