लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायदे अनेक आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवायच्या असतील तर राज्यात व देशात शेती कोर्ट किंवा शेतकरी लवादांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.
बीआरएसपीतर्फे उपरोक्त प्रश्नांसह राज्यातील जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांना घेऊन ५० दिवसीय जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना सुरेश माने म्हणाले, आगामी काळात नागरिकत्व व एनआरसीच्या विरोधातील लढा तीव्र करावा लागेल. वसतिगृहांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, ओबीसींची जनगणना करण्यात यावी, भीमा कोरेगाव आंदाेलनातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, मागासवर्गीय मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, वनवासी शब्दाला कायद्याने बंदी घालावी आदी प्रश्नांना घेऊन ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे.
३ जानेवारी रोजी गडचिरोलीतील आलापत्ती येथून या यात्रेची सुरुवात होईल. संपूर्ण राज्यभरात ही यात्रा फिरेल. ७ मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. त्यानंतर मार्च महिन्यात पक्षाचे तीन दिवसीय पंचवार्षिक अधिवेशन होईल. तसेच फेब्रुवारीपासून राज्यभरात आरक्षण परिषदा घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला रमेश पाटील, विशेष फुटाणे, भास्करराव बांबाेडे, विश्रांती झांबरे, शरद वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.