लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाचे संक्रमण अनियंत्रित झाले आहे. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला आहे. त्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातर्फे आणखी कडक पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. याअंतर्गत नागपुरातील संचारबंदी आणखी कडक केली जाणार आहे. औषधांची दुकाने सोडून अत्यावश्यक सेवेत येणारी किराणा, डेअरी, भाजीपाला यासह इतर वस्तूंची दुकानेही आता दुपारी १ पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात मनपातर्फे अधिकृत आदेश जारी केले जातील, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.
राऊत म्हणाले, नागपुरातील परिस्थिती पाहता, आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पोलिसांनाही आदेश देण्यात आले आहेत की, त्यांनी रस्त्यावर कुणालाही विनाकारण फिरू देऊ नये. त्यामुळे मंगळवारपासून ही संचारबंदी अधिक कडक झालेली दिसून येईल. जागोजागी नाकाबंदी राहील.
कोरोना नियंत्रणात आणायचा असेल, तर नागरिकांनीसुद्धा आपली जबाबदारी पार पाडायला हवी. त्यांनी घरीच राहावे, आपली व आपल्या कुटुंबाची काळाजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वर्धा येथे जम्बो रुग्णालय
प्रशासनाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बेड वाढवण्यास सुरुवात केली आहे. वर्धा येथील लॉयड स्टील प्लांट परिसरात हजार खाटांचे जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. यासोबतच मानकापूर स्टेडियम येथेही जम्बो रुग्णालय उभारण्यात येईल. यासोबतच तालुकास्तरावरही बेड वाढविण्यात येणार आहे.
कोराडी, खापरखेडा वीज केंद्रही ऑक्सिजन सिलिंडर पुरवणार
कोरोडी व खापरखेडा वीज केंद्रात उच्च शक्तीचा कॉम्प्रेसर उभारल्यास येथून दररोज एक हजार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होऊ शकतात. हे उच्च शक्तीचे कॉम्प्रेसर चीन, जर्मनी व रशियात मिळतात. चीनच्या एका कंपनीसोबत बोलणे झाले आहे. हे कॉम्प्रेसर वीजनिर्मितीच्या कामासाठीही वापरता येते. त्यामुळे याचा खर्च स्वत: वीज कंपनी देईल.