नागपूर : गुन्हे शाखेच्या डीसीपीतर्फे आठवड्याभरात तीन क्रिकेट सट्टा अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्याने बुकींमध्ये दहशत पसरली आहे. परिणामी बुकी शहरातून पलायन करीत आहेत. शहरातील जवळपास सर्वच बुकी आपला कारभार बंद करून शहरातून पळून गेले आहेत. आयपीएलच्या सामन्यात सट्टा लावतांना पुन्हा पकडले जाण्याच्या भीतीपोटी बुकींनी हे पाऊल उचलले आहे. गुन्हेशाखेच्या डीसीपी दीपाली मासिरकर यांना एका आठवड्यात आयपीएल सट्टेबाजांच्या तीन अड्ड्यांवर धाड टाकली. त्यांनी पहिली कारवाई तहसील ठाण्यांतर्गत भाजी बाजारात केली होती. २१ एप्रिल रोजी बोखारा येथील अष्टविनायक सोसायटीतील एका बंगल्यात सात सट्टेबाजांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळून १४ लाखाचा माल जप्त करण्यात आला होता. अड्ड्याचा सूत्रधार रुपेश ऊर्फ काली जंगी फरार झाला होता. शनिवारी जरीपटका ठाण्यांतर्गत येणाऱ आर्यनगरातील नागार्जुन कॉलनीमध्ये धाड टाकली. तेथून मनोज मंगलजीत दत्तानी, महेंद्र साठवणे, शैलेश अग्रवाल, जितेंद्र इंदूरकर आणि राकेश पौनीकर यांना पकडले होते. आरोपी मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद सनरायजर्स यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यावर खायवडी करीत होते. त्यांच्याजवळून २२,६८० रुपये, २५ मोबाईल, टीव्हीसह १ लाख ७२ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या धर्तीवर शनिवारी सदर पोलिसांनी सुद्धा क्रिकेट सट्ट्याचा अड्डा उघडकीस आणला. शहर पोलिसांची कार्यपद्धती बदलल्यामुळे सट्टेबाज शनिवारीच नागपुरातून रवाना झाले. सूत्रानुसार बहुतांश सट्टेबाज भंडारा आणि गोंदियाला गेले आहेत. तेथून ते सट्टा चालवणार आहेत. (प्रतिनिधी)
नागपुरातील क्रिकेट सट्टेबाजांचे पलायन
By admin | Updated: April 27, 2015 02:24 IST