नागपूर : प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे शनिवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेन्नई-दिल्ली विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
इंडिगो एअरलाइन्सचे विमान क्रमांक ६ ई ६२३५ चेन्नईवरून दिल्लीला जात होते. दरम्यान, या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे हे विमान नागपूर विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानाच्या पायलटने एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी)सोबत संपर्क साधल्यानंतर सकाळी ९.५२ वाजता विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानतळावर कार्यरत किंग्स-वे रुग्णालयाचे इमर्जन्सी थेरपिस्ट मोहम्मद एहतेशामोद्दीन यांनी प्रकृती बिघडलेले प्रवासी छोटू सिंह यादव (६५) यांची प्राथमिक तपासणी केली. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये रवाना करण्यात आले. मेडिकलमध्ये आवश्यक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी या प्रवाशास मृत घोषित केले. संबंधित प्रवाशाची कोरोना आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी नमुना घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी १०.४४ वाजता हे विमान दिल्लीकडे रवाना झाले.
..............