- विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी : सदस्यांसाठी स्पर्धकच नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २००५ सालापासून विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी अविरोध स्थानापन्न होत आहे. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असून, नव्या कार्यकारिणीसाठी विदर्भ साहित्य संघाकडे केवळ २२ अर्ज प्राप्त झाले आहेत. अध्यक्षपदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले असले तरी गेल्या १६ वर्षांची ‘अविरोध’ परंपरा कायम राखली जाईल, हेच चिन्ह दिसत आहे. निवडणुकीची घोषणा आणि कार्यप्रणाली केवळ औपचारिक असल्याचेच सिद्ध होत आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आणि १४ मार्चपर्यंतचा निवडणुकीचे वेळापत्रक सादर झाले. एक अध्यक्ष आणि २२ जणांचा कार्यकारी मंडळ, असे कार्यकारिणीचे स्वरूप आहे. २३ जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची मागणी होती. त्याअनुषंगाने कार्यकारिणी मंडळासाठी २२ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. एकही जास्त अर्ज नसल्याने कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्यासह सतीश तराळ यांचाही अर्ज असल्याने, केवळ अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे चित्र असले तरी ते केवळ आभासी असल्याचे स्पष्ट होते. गेल्या १५ वर्षांच्या परंपरेनुसार विचार केल्यास, हे स्पष्ट होईल. ८ फेब्रुवारी रोजी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असल्याने, त्याच दिवशी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यासोबतच ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
नव्यांची बसेल कार्यकारिणी
कार्यकारी मंडळासाठी प्राप्त २२ अर्जांमध्ये विद्यमान कार्यकारिणीतील प्रकाश एदलाबादकर, नरेश सब्जीवाले, डॉ. श्रीपाद जोशी, विलास देशपांडे यांची नावे नाहीत. त्यामुळे, अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. मात्र, विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सव समितीसाठी या नावांना आधीच आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. १४ जानेवारी २०२२ ते १४ जानेवारी २०२३ हे संघाचे शतकी महोत्सवी वर्ष असल्याने, ही समिती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने आलेले अर्ज
अध्यक्षपदासाठी मनोहर म्हैसाळकर व सतीश तराळ यांचे अर्ज आहेत. कार्यकारी मंडळ सभासदत्वासाठी प्रा. विवेक अलोणी, मोना चिमोटे, तीर्थराज कापगते, डॉ. श्याम मोहरकर, डॉ. रमाकांत कोलते, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, डॉ. राजेंद्र डोळके, प्रा. गजानन वाघ, संयोगीता धनवटे, डॉ. इंद्रजीत ओरके, डॉ. रवींद्र शोभणे, विकास लिमये, नितीन सहस्रबुद्धे, उदय पाटणकर, प्रदीप मुन्शी, विलास मानेकर, प्रफुल्ल शिलेदार, भाग्यश्री बनहट्टी, गजानन नारे, प्रदीप दाते, सतीश तराळ, डॉ. रमेश जलतारे यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.