नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर राहणाऱ्या एका सधन कुटुंबातील वृद्ध महिलेची सोमवारी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाली. त्यामुळे नागपुरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनाही जबर हादरा बसला आहे.शशिकला नाशिकराव ठाकरे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अमित (मुलगा) हे वर्धा येथे एका महाविद्यालयात विभागप्रमुख असून, सून शुभांगी यासुद्धा हिंगण्याच्या एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. त्यांना आरोही (वय ५ वर्षे) ही मुलगी आहे. शशिकला यांची मुलगी वैशाली आणि जावईसुद्धा अधिव्याख्याते असल्याची घटनास्थळी चर्चा होती. मुलीचे औचित्य (वय ९ वर्षे) आणि सार्थ (वय ७ वर्षे) ही मुले आजीजवळच राहतात. ठाकरे कुटुंबीयांची सक्करदरा पोलीस ठाण्यासमोरच्या ओमनगरात इमारत आहे. या इमारतीच्या तळमाळ्यावर शशिकला सहपरिवार राहत होत्या. त्यांनी पहिला माळा कौटुंबिक सदस्यांच्या वापरासाठी रिकामा ठेवला होता. तर, दुसऱ्या माळ्यावरच्या रूम काही दिवसांपूर्वी तीन विद्यार्थिनींना भाड्याने दिल्या होत्या. मुलगा आणि सून नोकरीवर तर नातवंडं सकाळी ८ वाजताच शाळेत जात होते. त्यामुळे दुपारी ४ पर्यंत शशिकला एकट्याच घरी राहात होत्या. सोमवारीही तसेच झाले. सर्व जण सकाळी घरून शाळा, महाविद्यालयात निघून गेले. दुपारी ३.३० च्या सुमारास एका शेजारणीला दार उघडे दिसल्याने त्यांनी आत डोकावले. याचवेळी त्यांचे नातूही शाळेतून परतले. त्यांनी आतमध्ये बघितल्यानंतर त्यांना शशिकला रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्या. आजीची अवस्था पाहून त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे अन्य शेजारी गोळा झाले. एका शेजाऱ्याने इमारतीच्या वरच्या माळ्यावरून पोलीस ठाण्याच्या आवारातील कर्मचाऱ्यांना हत्या झाल्याचे कळविले. त्यामुळे सक्करदरा ठाण्यातील पोलीस ठाकरे त्यांच्या निवासस्थानी धावले. पोलीस ठाण्यासमोर वृद्धेची हत्या झाल्याची वार्ता शहरात पसरली. परिणामी गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ चारचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञांचे पथक, गुन्हेशाखेच्या पथकांसह आजूबाजूच्या ठाण्यातील पोलिसांनाही घटनास्थळी बोलवून घेण्यात आले. शशिकला यांच्या सून आणि मुलाला बोलवून घेण्यात आले. पोलीस आणि कुटुंबीयांनी पाहणी केली असता मारेकऱ्याने आधी जड वस्तूने शशिकला यांच्या डोक्यावर प्रहार केल्याचे आणि नंतर त्यांच्या गळ्याजवळ कैची भोसकून त्यांना ठार मारल्याचे आढळले. घरातील कपाटं तसेच अन्य साहित्य अस्तव्यस्त होते. ठाकरे कुटुंबातील सदस्यांनी घरातील काही दागिने आणि मौल्यवान चीजवस्तू दिसत नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे लुटमारीच्या उद्देशाने आलेल्या मारेकऱ्यांनी विरोधामुळे शशिकला यांची हत्या केल्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी बांधला.(प्रतिनिधी) संशयित सीसीटीव्हीत कैद घटनास्थळ परिसरातील चर्चेनुसार, शशिकला कणखर स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यात कसलीही कसर सोडली नाही. ज्या पद्धतीने आरोपीने शशिकला यांची हत्या केली ते पाहता आरोपी शशिकला यांच्या ओळखीचा असावा. त्या दुपारी ४ पर्यंत घरी एकट्याच राहात असल्याचे त्याला माहीत असावे आणि तेथे मोठा माल हाती लागू शकतो, याचीही त्याला कल्पना असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला. पोलिसांनी इमारतीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात दुपारी पावणेदोन वाजता शशिकला एका शेजारणीशी बोलताना दिसतात. त्यामुळे दुपारी १.४५ ते ३.३० या वेळेत ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांना काढला आहे. सीसीटीव्हीत दोन संशयित घरासमोर रेती गिट्टीचे काम करीत होते, असे दिसते. घटनेच्या वेळेपासून ते बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्यावरच पोलिसांचा संशय आहे. ‘त्या’ दोघांचा शोध घेतला जात आहे. लाजीरवाणी बाब पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित मानला जातो. मात्र, आज पोलीस ठाण्यासमोरच हत्येसारखी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसाठीही ही घटना लाजिरवाणी ठरली आहे. सक्करदरा परिसरात दोन आठवड्यात झालेली ही दुसरी हत्या आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ९ सप्टेंबरला आशिष राऊत या गुंडाची हत्या झाली होती. आता शशिकला यांची हत्या झाली. त्यामुळे मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सक्करदरासह आजूबाजूच्या परिसरातील गुन्हेगारांचीही धरपकड सुरू केली. रेती-गिट्टीचे काम करणाऱ्या ‘त्या’ दोघांचा पत्ता मिळवण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती.
पोलीस ठाण्यासमोर वृद्धेची हत्या
By admin | Updated: September 27, 2016 03:29 IST