लोकमत न्यूज नेटवर्क
गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पाकिस्तानवर परत एकदा प्रहार केला आहे. भारतातील जास्तीत जास्त भाग पाकिस्तानमध्ये जावा यासाठी १९३० पासूनच योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. स्वत:चे वर्चस्व निर्माण करून सिंध, पंजाब, आसाम, बंगालमध्ये पाकिस्तान स्थापन करण्याची योजना होती. मात्र ही योजना पूर्णत: यशस्वी होऊ शकली नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पाकिस्तानला आसाम त्यांना मिळाला नाही. पंजाब, बंगाल त्यांना अर्धाच मिळाला. शिवाय मधला कॉरिडॉर त्यांना मिळाला नाही. मागून जे मिळाले ते मिळाले, आता बाकीचे कसे घ्यायचे यावर पाकिस्तानचा विचार सुरू झाला. अनेक पीडित शरणार्थी म्हणून भारतात यायचे. मुस्लिमांची संख्या वाढविण्यासाठी तिकडून इकडे येणाऱ्यांना सहकार्य करण्यात येत होते व आजदेखील होते. जास्तीत जास्त भूभागावर मुस्लिमांची संख्या वाढेल व तेथे पाकिस्तानसारखेच सगळे काही होईल. जे आमच्यापासून वेगळे आहेत ते आमच्या दयेवर तेथे राहतील, असा त्यांचा मानस आहे. पाकिस्तानमध्ये हेच होत आहे व अगोदरच्या पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) हेच प्रयत्न झाले, असे सरसंघचालक म्हणाले.