नागपूर : १०० कोटींच्या वसुली प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिरा येथील माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरांवर धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी विस्तृत माहिती देण्यास नकार दिला. धाडीदरम्यान अनिल देशमुख कुटुंबीय मुंबईला असल्याची माहिती आहे.
ईडीच्या धाडीमुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. रविवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. धाडीत मुंबई आणि नागपूरचे अधिकारी सहभागी असल्याची माहिती आहे. ईडीने आधीच देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप केलेला आहे. आरोपानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आले. कारवाईचे वृत्त पसरताच देशमुख यांच्या समर्थकांनी बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कारवाई विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.