लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : मागील अनेक वर्षांपासून उमरेड नगरीत सुलभ शौचालयाची मागणी होती. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक शहरात येतात. अशावेळी त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची सुविधा नव्हती. ‘लोकमत’नेसुद्धा या बाबीकडे अनेकदा लक्ष वेधले. आता शहरात लवकरच ‘पे ॲण्ड यूज’ या तत्त्वावर वेगवेगळ्या मुख्य सहा ठिकाणी ‘सुलभ शौचालय’ची सुविधा होणार आहे.
नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत १ कोटी ७० लाख रुपयांची मंजुरी यासाठी मिळाली असून, योग भवन येथील कामही सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत जुने शासकीय धान्य गोदामालगत काम सुरू होणार आहे. या दोन ठिकाणांसह इतवारी टिळक बाजारपेठ राजेबाबा देवस्थानलगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक, गंगापूरलगत मकरधोकडा नाका परिसर आणि शासकीय विश्रामगृह याठिकाणी सुलभ शौचालयाची सुविधा होणार आहे. काही ठिकाणी जागेबाबतची समस्या उद्भवत असून, याकरिता थोडा विलंब होऊ शकतो. एका सुलभ शौचालयाच्या बांधकामास साधारणत: चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पालिकेचे कनिष्ठ अभियंता जगदीश पटेल यांनी दिली.
...
महिलांसह नागरिकांची गैरसोय होऊ नये. शिवाय, अस्वच्छता पसरू नये. यासाठी पालिकेने शहरात ठिकठिकाणी सुलभ शौचालयांची सुविधा करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- विजयलक्ष्मी भदोरिया, नगराध्यक्ष, नगर परिषद, उमरेड.