सुमेध वाघमारे
नागपूर : पूर्व विदर्भात दररोज सरासरी १० जणांना सर्पदंश होत असल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांत सर्पदंशाच्या नऊ हजाराहून अधिक घटना घडल्मल्रया असून यातील ४६ रुग्णांचे जीव गेले आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यातील २० मृत्यू व १९८३ प्रकरणे आहेत. विशेष म्हणजे, नोंद न झालेल्यांची संख्या याच्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. जवळपास ७५ टक्क्यांहून अधिक घटना पावसाळ्यातील असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांच्या जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. पूर्व विदर्भात १ जानेवारी १८ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सर्वाधिक सर्पदंशाचे प्रमाण भंडारा जिल्ह्यात आढळून आले. १९८३ प्रकरणे समोर आली. यातील २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्पदंशाची १९०९ प्रकरणे आढळून आली. यातील ३ रुग्णांचा जीव गेला. गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रकरण कमी असताना येथे १८ रुग्णांचे बळी गेले आहेत. या जिल्ह्यात १७८४ रुग्णांची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात १८६७ रुग्ण व ३ मृत्यू तर नागपूर जिल्ह्यात १४६४ रुग्ण व १ रुग्णाचा बळी गेला आहे. सर्वात कमी नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली. ७७५ रुग्ण व १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात पावसाळ्यातील सर्वाधिक प्रकरणे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
जून महिन्यात २६४ प्रकरणे, ६ मृत्यू
पावसाला सुरुवात होताच जून महिन्यात पूर्व विदर्भात सर्पदंशाची २६४ प्रकरणे समोर आलीत. यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात ३४, चंद्रपूरमध्ये ५० रुग्ण, ४ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात ३५ रुग्ण, १ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ४६ रुग्ण, नागपूर जिल्ह्यात ४२ रुग्ण तर वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ५७ रुग्णांची नोंद झाली.
पावसाळ्यात सर्पदंश टाळता येऊ शकतो, ही घ्या काळजी
::जिथे गवत मोठ्या प्रमाणात वाढले तेथे जाण्याआधी साप किंवा त्याचे बीळ नाही ना, याची खात्री करून घ्या
:: गवतातून चालताना पायात बूट घाला
:: उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी जाड बूट घालावे सोबतच पोटरीचे संरक्षण करू शकतील असे आवरण बांधावे
:: शेतातील गवत किंवा कडबा उचलताना खाली साप नाही याची खात्री करा
:: उंदराचा वासाने साप येऊ शकतात, यामुळे उरलेले अन्न दूर टाका
:: घराबाहेर अनावश्यक वस्तूंचा ढीग टाळा
:: बागेतल्या झाडांच्या फांद्या किंवा वेली खिडक्यांपासून दूर ठेवा
:: ग्रामीण भागात किंवा शेतात घर असलेल्यांनी रात्री झोपताना भिंतीपासून थोडी जागा सोडून झोपा
:: खाली झोपणाऱ्यांनी आपल्या अंथरुणाच्या बाजूने रॉकेलचा बोळा करून रेघ ओढा
::२०१८ ते २०२० सर्पदंश व मृत्यू
भंडारा : १९८३ :२०
चंद्रपूर : १९०९ : ०३
गडचिरोली :१७८४ : १८
गोंदिया :७७५ : ०१
नागपूर :१४६४:०१
वर्धा : १८६७ : ०३